दिसली जागा की लाव फलक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 03:12 AM2017-08-04T03:12:20+5:302017-08-04T03:12:20+5:30
दिसली मोकळी जागा की लाव फलक! या वृत्तीमुळे पाषाण, बाणेर, बालेवाडी, औंध, बोपोडी, बावधन परिसरात मोठ्या प्रमाणात जाहिरातींचे फ्लेक्स उभारण्यात आले असून
औंध : दिसली मोकळी जागा की लाव फलक! या वृत्तीमुळे पाषाण, बाणेर, बालेवाडी, औंध, बोपोडी, बावधन परिसरात मोठ्या प्रमाणात जाहिरातींचे फ्लेक्स उभारण्यात आले असून, यापैकी कित्येक फ्लेक्स हे बेकायदेशीर आहेत. या फलकांमुळे जाहिरातबाजांचा उद्देश सफल होत असला तरी होणाºया त्रासामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून हे अवैध फ्लेक्स त्वरित हटवण्याची मागणी जोर धरत आहे.
विविध चौकातील सर्कल, रस्त्याच्या दुतर्फा, मुख्य रहदारीच्या मार्गावर, मोठमोठ्या इमारतींवर लावलेल्या फ्लेक्समुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. याबाबत लोकप्रतिनिधीही प्रशासनाला जाब विचारत नाहीत. त्यामुळे या सर्व परिसरांत ठिकठिकाणी लावण्यात आलेले होर्डिंग्ज काढण्यासाठी कुणी पुढाकार घ्यावा, असा प्रश्नही निर्माण झाला
आहे.
लोकप्रतिनिधींनी सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित केला, तर पालिका जागी होत याबाबत कायदेशीर पाऊल उचलू शकते, परंतु कुणालाही तशी आवश्यकता वाटत नसल्यामुळे नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. या माध्यमातून प्रशासन काही आर्थिक हित तर जोपासत नाही ना, असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे.