राज्यातील कायदा सुव्यवस्था सरकारच्या नियंत्रणाबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:12 AM2021-02-16T04:12:55+5:302021-02-16T04:12:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी लहान मुलीवर बलात्कार होतो, ही घटना अतिशय गंभीर आहे. राज्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी लहान मुलीवर बलात्कार होतो, ही घटना अतिशय गंभीर आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे द्योतक असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.
विमाननगर परिसरातील एका पाच वर्षांच्या मुलीवर रविवारी दुपारी एका सुरक्षारक्षक कर्मचाऱ्याने बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शने केली. या आंदोलनानंतर मुळीक पत्रकारांशी बोलत होते.
महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सरचिटणीस गणेश घोष, दत्ता खाडे, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर उपस्थित होते.
मुळीक म्हणाले, ‘गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ‘केवळ सत्तेच्या हव्यासापोटी जनमताचा अनादर करीत स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारला जनतेचे प्रश्न सोडविण्यात अजिबात स्वारस्य नाही. ही परिस्थिती बदलली नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठे जनआंदोलन केले जाईल.’
राज्याचे गृहमंत्री पुण्यात येतात. कंट्रोलरूममध्ये जाऊन सोशल मीडिया पोस्टसाठी स्टंट करतात. पण, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या सरकारच्या प्राधान्यक्रमात दिसत नसल्याची टीका या वेळी मुळीक यांनी केली.
---
फोटो मेल केला आहे