कायदा सर्वांसाठी समान, हे पोर्शे कार तपास प्रकरणाने सिद्ध केले - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 04:30 PM2024-11-16T16:30:00+5:302024-11-16T16:30:14+5:30

अल्पावधीत आरोपींना ताब्यात घेतले, यावरून कायदा सर्वांसाठी समान असतो, याचे उत्तम उदाहरण आहे

Law equal for all, Porsche car probe case proves - Police Commissioner Amitesh Kumar | कायदा सर्वांसाठी समान, हे पोर्शे कार तपास प्रकरणाने सिद्ध केले - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

कायदा सर्वांसाठी समान, हे पोर्शे कार तपास प्रकरणाने सिद्ध केले - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

पुणे : पुण्यात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या पोर्शे प्रकरणानंतर पुणेपोलिसांनी ज्या गतीने व कार्यक्षमतेने तपास केला, अल्पावधीत आरोपींना ताब्यात घेतले, यावरून कायदा सर्वांसाठी समान असतो, याचे उत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. कुणाची आर्थिक सत्ता, सामाजिक स्थान यांचे दडपण न घेता, कायद्यापुढे सर्वांना समान लेखण्याची ही कृती पोलिस यंत्रणा कार्यक्षम असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करणारी ठरली, आणि टीकाकारांना उत्तर देणारी ठरली, असेही अमितेश कुमार म्हणाले.

पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्स, सिमेक्स, एसिस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सुरक्षित पुणे पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे बोलत होते. यावेळी सुरक्षित पुणे उपक्रमाचे ब्रॅँड अँबेंसेडर एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांची उपस्थिती होती.

अमितेश कुमार म्हणाले,'कोणतीही यंत्रणा म्हणजे जादूची छडी नसते. पुण्यासारखे शहर ८० लाखांहून अधिक लोकवस्तीचे झाले आहे. अशा ठिकाणी दिवसाचे २४ तास दक्ष राहून पोलिस यंत्रणा आपले कर्तव्य बजावत असते. शहराच्या कुठल्याही कोपऱ्यात काही घडले – बिघडले की पोलिस यंत्रणा तत्काळ कार्यान्वित होते आणि त्वरित घटनास्थळी पोहोचण्याच्या प्रयत्नात असते. पोलिसांना आपले कर्तव्य योग्य पद्धतीने बजावता यावे, यासाठी आधुनिक साधने, सामग्री व तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे. मात्र, शहरातील प्रत्येक नागरिकांचेही एक कर्तव्य आहे, ते म्हणजे दक्ष आणि सतर्क राहणे. आपल्या आसपास कोणतीही संशयास्पद हालचाल, कृती, व्यक्ती आढळल्यास त्वरित यंत्रणेला कळवणे, हे जबाबदार नागरिकांचे कर्तव्य असल्याचे सांगितले.

अग्निशमन दलाचे प्रमुख पोटफोडे यांनी, पडद्यामागील सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गौरव करत असल्याची कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या शहरातील रस्ते, प्रचंड लोकसंख्या, दाटीवाटीची वस्ती, झोपडपट्ट्या, पुरेशी दक्षता न घेता उभारले जाणारे उद्योग यामुळे सुरक्षेला धोका उत्पन्न होत आहे. अग्निशमन दलाकडे मनुष्यबळ, साधनसामग्रीची कमतरता असूनही दलाकडून सातत्याने प्रत्येक ठिकाणी सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, आपल्या कामाच्या जागा, उद्योगाच्या जागा व यंत्रणा पुरेशा सुरक्षित असल्याची काळजी संबंधित समाज घटकांची असल्याचे स्मरण प्रत्येकाला असावे, असेही ते म्हणाले. गोखले यांनी बाह्य व अंतर्गत सुरक्षा या राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित असतात, याची जाणीव प्रत्येक नागरिकाने ठेवली पाहिजे, असे सांगितले.

यावेळी पोलिस दलासह अग्निशमन दलातील कार्यक्षम अधिकारी - कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव अमितेश कुमार, देवेंद्र पोटफोडे व भूषण गोखले यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच हाॅटेल, शिक्षणसंस्था, काॅर्पोरेट, माॅल, बॅंक, वर्क स्पेस अशा विविध आस्थापनांत सर्वोत्कृष्ट सुरक्षेचे मानदंड प्रस्थापित करणाऱ्या संस्था, व्यक्तींना देखील गौरवण्यात आले.

Web Title: Law equal for all, Porsche car probe case proves - Police Commissioner Amitesh Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.