गणित, भौतिकशास्त्र ऐच्छिकचा नियम विचित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:10 AM2021-03-14T04:10:27+5:302021-03-14T04:10:27+5:30
पुणे :“आयआयटी’सारख्या दर्जेदार शिक्षण संस्थांच्या संयुक्त प्रवेश परीक्षेत अनिवार्य असलेले भौतिकशास्त्र व गणित हे विषय अभियांत्रिकीसाठी बारावीला मात्र ऐच्छिक ...
पुणे :“आयआयटी’सारख्या दर्जेदार शिक्षण संस्थांच्या संयुक्त प्रवेश परीक्षेत अनिवार्य असलेले भौतिकशास्त्र व गणित हे विषय अभियांत्रिकीसाठी बारावीला मात्र ऐच्छिक हा नवा नियम विचित्र आहे. भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने नियमावली मागे घेतली असली तरी अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा उंचावणारा निर्णय झाला पाहिजे,” असे मत भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नव्या निर्णयावर डॉ. भालेराव यांनी मत मांडले आहे. ते म्हणाले, की दोन दिवसांत सुधारित मसुदा जाहीर करू असे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने सांगितले आहे. मात्र, बदललेले पात्रता निकष मागे घेणार की काय हे अजून समोर आलेले नाही.
पदवीधर अभियंते आणि बाजाराच्या, उद्योगांच्या गरजा यांची सांगड नाही म्हणून अभियांत्रिकी महाविद्यालयांवरच गदा येते. ही स्थिती असताना, अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा उंचावणे अत्यावश्यक ठरते. विद्यार्थीही तावूनसुलाखून निवडलेले असणे ही अशा वेळी किमान गरज ठरते, असे डॉ. भालेराव म्हणाले. ‘एआयसीटीई’ या विद्यार्थ्यांना निवडस्वातंत्र्याच्या नावाखाली भौतिकशास्त्र व गणितासारख्या विषयांमधून सवलत देऊ पाहाते आहे, यामुळे अभियांत्रिकी शिक्षण धसाला लागणार असल्याचे ते म्हणाले.