राजकारणातील घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी कायदा व्हायला हवा : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 03:43 PM2018-02-05T15:43:36+5:302018-02-05T15:44:02+5:30

एका कुटुंबातील एक सदस्य निवडणुकीला उभा राहिल्यानंतर त्या घरातील दुसऱ्या सदस्याला पुढील ५० वर्षात राजकारणात प्रवेश देता कामा नये, तसा कायदा व्हायला हवा, असे मत कृषी-पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. 

The law should be enacted to eliminate the dynastic politics: Sadabhau Khot | राजकारणातील घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी कायदा व्हायला हवा : सदाभाऊ खोत

राजकारणातील घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी कायदा व्हायला हवा : सदाभाऊ खोत

googlenewsNext
ठळक मुद्देराजकारणात घराणी स्थिर झाली की ती दुसऱ्याला राजकारणात येऊ देत नाहीत : खोतडॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे आयोजित तिसऱ्या युवा संसदेचा समारोप

पुणे : राजकारणात स्पर्धा नाही, तर घराणेशाहीची परंपरा आहे. त्यामुळे नव्या दमाच्या तरुणाईचा यामध्ये नंबर लागणे कठिण आहे. राजकारणात घराणी स्थिर झाली की ती दुसऱ्याला राजकारणात येऊ देत नाहीत. एकेका कुटुंबातील ५ ते ६ सदस्य राजकारणात सक्रिय असल्याची उदाहरणे आहेत. स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण झाली तरीही या घराण्यांची सेवा पूर्ण झालेली नाही. त्यामुळे एका कुटुंबातील एक सदस्य निवडणुकीला उभा राहिल्यानंतर त्या घरातील दुसऱ्या सदस्याला पुढील ५० वर्षात राजकारणात प्रवेश देता कामा नये, तसा कायदा व्हायला हवा, असे मत कृषी-पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. 
नऱ्हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे आयोजित तिसऱ्या युवा संसदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गोवा विधानसभा अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, आमदार कपिल पाटील, प्रा. नितीन बानगुडे पाटील, मेजर जनरल दिलावर सिंग, सुरेश पाटील, प्रा. डॉ. मुकुंद सारडा, अंकुश काकडे, अभिनेते सुनील गोडबोले, जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, संसदेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान प्रकल्प स्पर्धेतील विज्येत्यांना सन्मानित करण्यात आले. 
खोत पुढे म्हणाले, की राजकारण, समाजकारण ही चांगली क्षेत्रे आहेत. त्यामुळे चांगल्या माणसांनी यामध्ये यायला हवे. देशाची घटना, संविधान धोक्यात आले आहेत, असे जे लोक म्हणत आहेत, त्यांचे राजकारण धोक्यात आले आहे. याबाबत विनाकारण दंगा सुरु असून तरुणांची माथी भडकविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे युवकांनी राजकारणात यावे, याकरिता वैचारिक पिढी घडवावी लागेल. 
डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की महाविद्यालयीन काळातच जातीयवाद मोठ्या प्रमाणात तरुणांना पहायला मिळतो. उच्च शिक्षणाकरिता प्रवेश घेताना जातीची बंधने सुरु होतात. जातीवाद हा राष्ट्राला धोकादायक असून तरुणाईला घातक आहे. युवकांमध्ये भारताच्या नवनिमीर्तीची ताकद आहे. देशाच्या विकासासाठी तरुणाईने एकत्र या, असे आवाहन त्यांनी केले. 
कपिल पाटील म्हणाले, की देशातील तरुणाई जेव्हा सरकारकडे विविध प्रश्नांविषयी मागणी करते, तेव्हा जाती-धर्मात भांडणे लावणे हा सोपा मार्ग अवलंबिला जात आहे. या धोरणाला बळी पडायचे नाही, असे तरुणांनी ठरवायला हवे. आज जातीवादाचे मोठे आव्हान असून त्याचा सामना करण्याची वेळ तरुण पिढीवर आली आहे, असेही ते म्हणाले.  
महाराष्ट्र आणि गोवा येथून सुमारे २५० विद्यार्थी नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून संसदेत सहभागी झाले होते. तर महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, अकोला, सातारा, मराठवाडा, मुंबई यांसह विविध भागांतून २ हजार विद्यार्थी संसदेकरीता पुण्यामध्ये आले होते. कॉमनवेल्थ युथ कौन्सिलचे यंदा संसदेला सहकार्य मिळाले. सोड नाराजी घे भरारी, विकासाचे राजकारण म्हणजे काय, माझा राष्ट्रवाद आणि तुझा राष्ट्रवाद... खरा कोणाचा, सशक्त युवा सशक्त भारत, जातीवाद आघाडीवर आधुनिकता पिछाडीवर अशा विविध विषयांवर संसदेत चर्चा व मार्गदर्शन झाले. 

Web Title: The law should be enacted to eliminate the dynastic politics: Sadabhau Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.