लॉरेन्स बिश्नोई गँगने मागितली पुण्यातल्या प्रसिद्ध ज्वेलर्सकडे १० कोटींची खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 12:33 PM2024-10-20T12:33:35+5:302024-10-20T12:34:56+5:30
संबंधित ज्वेलर्स जगभरात त्यांचा ब्रँड ओळखला जात असून दुबईतदेखील त्यांच्या शाखा आहेत, तेथे चांगले नाव झाल्याने बिश्नोई गँगकडून या व्यावसायिकाला टार्गेट करण्यात आले
पुणे: शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्स व्यावसायिकाला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी ई-मेलद्वारे ही खंडणी मागण्यात आली असून, पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकीदेखील दिली आहे. या मेलमध्ये आम्ही बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचा उल्लेख केला आहे. संबंधित ज्वेलर्स व्यावसायिकाने शनिवारी (दि. १९) पुणेपोलिस आयुक्तालयात धाव घेत याबाबत माहिती दिली. गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
संबंधित ज्वेलर्स पुण्यातच नाही, तर जगभरात त्यांचा ब्रँड ओळखला जातो. दुबईतदेखील त्यांच्या शाखा असून, तेथे चांगले नाव झाल्याने बिश्नोई गँगकडून संबंधित व्यावसायिकाला टार्गेट करण्यात आले आहे. मेलमध्ये ‘बाबा सिद्दिकीप्रमाणे आपला जीव जाऊ द्यायचा नसेल तर १० कोटी रुपये लॉरेन्स बिश्नोई गँगला द्या, ही रक्कम कधी आणि कशा प्रकारे द्यायची आहे यासंबंधीची माहिती दुसऱ्या मेलद्वारे पाठविण्यात येईल,’ असे म्हटले आहे. तसेच पोलिसांना याबाबत माहिती दिली तर चांगले होणार नाही, असेही म्हटले आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे. ज्या आयपी ॲड्रेसवरून खंडणीचा मेल आला आहे, त्याचा तपास पोलिस करीत आहेत. आलेल्या मेलची सत्यता किती आहे याबाबत पोलिसांना अद्याप माहिती नाही.
संबंधित मेल खरोखरच बिश्नोई गँगकडून आलेला आहे की, त्या गँगच्या नावाचा वापर करीत दुसऱ्याने हा मेल केला आहे, याचा पोलिस तपास करीत आहेत. पुणे पोलिसांकडून संबंधित ज्वेलर्स व्यावसायिकाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्वेलर्सचे नाव जाहीर करता येणार नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.