रवींद्र बऱ्हाटेला आश्रय देणाऱ्या वकिलास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:13 AM2021-08-28T04:13:46+5:302021-08-28T04:13:46+5:30
पुणे : मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यात फरारी असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला आश्रय देणाऱ्या वकिलाला पोलिसांनी अटक केली. याच ...
पुणे : मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यात फरारी असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला आश्रय देणाऱ्या वकिलाला पोलिसांनी अटक केली. याच वकिलाच्या घरातून पोलिसांना आव्हान देणारे व्हिडिओ बऱ्हाटेने सोशल मीडियावरून व्हायरल केले होते. मात्र शोध घेऊनही पोलिसांना बऱ्हाटे सापडत नव्हता. राज्यभर पोलीस शोध घेत असताना पुण्याजवळच तो अधिक काळ लपून बसला होता. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
सागर संजय म्हस्के (वय ३२ रा. म्हस्केवस्ती, कळस आळंदी रस्ता) असे अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. एक डझनहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या बऱ्हाटेला फरार मुदतीत राहण्यास आश्रय दिल्याप्रकरणी मस्केला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा एकचे सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. फिर्यादीचे रो हाऊस जबरदस्तीने हडपण्यासाठी जिवे मारण्याची धमकी देत बनावट दस्त बनवण्याबरोबरच खंडणी मागितल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात बऱ्हाटेसह तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यात बऱ्हाटेवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. बऱ्हाटे हा दीड वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता. तो आळंदी रस्त्यावरील म्हस्केवस्ती येथे सागर म्हस्के याच्या घरात राहात असल्याचे निष्पन्न झाले आहे. बऱ्हाटेला फरार राहाण्यास आणि त्याचे अस्तित्व लपविण्यास मदत केल्याप्रकरणी सागर म्हस्केला गुरुवारी (दि. २६) पावणेसात वाजता अटक करण्यात आली.