वकील रोहित शेंडेचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:09 AM2021-06-10T04:09:23+5:302021-06-10T04:09:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरातून वकील उमेश मोरे याचे अपहरण करून खून करण्यात आलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरातून वकील उमेश मोरे याचे अपहरण करून खून करण्यात आलेल्या प्रकरणातील सहआरोपी वकिलाने वडील आजारी असल्याने उपचार तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी तात्पुरता जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्याला विशेष सरकारी वकिलांनी विरोध केल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी शेंडे याचा जामीन अर्ज फेटाळला.
रोहित दत्तात्रय शेंडे (वय ३२, रा. संतनगर, अरण्येश्वर) असे जामीन फेटाळलेल्या आरोपी वकिलाचे नाव आहे. याप्रकरणात कपिल विलास फलके (वय ३४, रा. चिखली), दीपक शिवाजी वांडेकर (वय २८, रा. साले वडगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांच्यासह आणखी एका आरोपीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत उमेश याचा भाऊ प्रशांत मोरे (रा. जामखेड) यांनी फिर्याद दिली आहे.
कोरोना प्रादुभार्वामुळे राज्यातील विविध कारागृहातील बंदी तसेच न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आरोपी रोहित शेंडे यानेही वडिलांच्या आजारपणासाठी तात्पुरता जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणातील अर्जदार आरोपीने इतर सहका-याच्या मदतीने कट रचून नियोजित पद्धतीने शिवाजीनगर न्यायालयात वकिली करणारे उमेश मोरे यांचे न्यायालय परिसरातून अपहरण केले. तसेच ताम्हिणी घाटात त्यांचा खून केला आहे. याबाबत ठोस पुरावे तपास यंत्रणेला मिळाले आहेत. तसेच तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे केलेल्या कारवाईत रोहित शेंडे याला लाच घेताना रंगेहात पकडले होते. त्या प्रकरणात उमेश मोरे याने तक्रार दिली होती.
अर्जदार शेंडे याचा भाऊ आणि परदेशात वास्तव्य करणारी बहीण पुण्यात असून, ते आजारी असलेल्या वडिलांची काळजी घेत आहेत, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच आरोपी शेंडे हा वकील आणि प्रभावी व्यक्ती आहे. तो जामिनावर कारागृहाबाहेर आला तर तो साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो आणि पुराव्यासोबत छेडछाडही करण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने रोहित शेंडे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.