वकील महिलेकडून न्यायालयातच आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 08:53 PM2019-05-03T20:53:56+5:302019-05-03T20:55:47+5:30
काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिला वकिलाने आज न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न केला.
पुणे : काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिला वकिलाने आज न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेनंतर संबंधित महिलेला तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित महिलेवर डेक्कन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्या जिल्हा न्यायालयातील जुन्या इमारतीमध्ये असलेल्या न्यायालयात हजर होत्या. सुनावणी झाल्यानंतर दुपारी सव्वाचारच्या दरम्यान त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
टिळक यांचे वकील नंदू फडके यांच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी. तसेच नंदू फडके यांचा मुलगा संदीप फडके यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महिलेवर डेक्कन पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर महिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. आपण तपासात सहकार्य करण्यासाठी तयार असून पोलिसांनी चौकशी करावी, असा अर्ज देखील त्यांनी डेक्कन पोलिसांनी दिला आहे. मात्र त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. तसेच त्यांना गुंतवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांमुळे त्या तणावाखाली असल्याचा दावा फिर्यादी महिलेच्या वकीलांनी केला. न्यायालयात त्या कोसळल्यानंतर बाजुला असलेल्या वकिलांनी त्वरित पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलून महिलेला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठवले.