पोलिसांना देण्यासाठी पैशांची मागणी करुन लाच घेणारा वकील जाळ्यात
By विवेक भुसे | Published: January 11, 2024 02:29 PM2024-01-11T14:29:26+5:302024-01-11T14:30:44+5:30
कोथरुडमधील पौड रोडवरील वनाज कॉर्नरजवळ सापळा रचून २० हजारांची लाच घेताना वकिलाला पकडण्यात आले
पुणे : पोलिसांना सांगून गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच पोलिसांना देण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या वकिलाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पावणे लाच घेताना रंगेहाथ पकडले.
सुमित नामदेवराव गायकवाड (वय २५, रा. भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव पठार) असे या वकिलाचे नाव आहे. याबाबत एका २५ वर्षाच्या महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांच्या व्यक्तिगत अडचणींमुळे त्यांच्या दोन मित्रांना शास्त्रीनगर पोलीस चौकीत पोलिसांनी नेले होते. त्यानंतर तक्रारदार यांच्या मित्रांचे ओळखीचे ॲड. सुमित गायकवाड याने तक्रारदार व त्यांच्या दोन्ही मित्रांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांसोबत तडजोड करतोय, असे सांगून ५ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडून १ लाख रुपये व त्यांच्या मित्रांकडून ५० हजार व ५ हजार असे फोन पे द्वारे असे एकूण १ लाख ५५ हजार रुपये घेतले होते. ते उर्वरित रक्कम देत नाहीत तोपर्यंत तक्रारदार यांच्याविरुद्ध असलेले पुरावे मी नष्ट करणार नाही, असे सांगून पोलिसांकरीता अजून साडेतीन लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती.
या तक्रारीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ३, ४ व ८ जानेवारी रोजी पडताळणी केली. त्यात तक्रारदार यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी साडेतीन लाख रुपयांची लाचेची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी कोथरुडमधील पौड रोडवरील वनाज कॉर्नरजवळ सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून २० हजार रुपये घेताना सुमित गायकवाड याला पकडण्यात आले. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विजयमाला पवार, पोलिस निरीक्षक अतुल भोसले, सहायक फौजदार मुकुंद अयाचित, शिल्पा तुपे, वनिता गोरे, सहायक फौजदार अविनाश चव्हाण, हवालदार दीपक काकडे यांनी ही कारवाई केली.