न्यायालयात डबा खाण्यासाठी वकिलांना मिळाली हक्काची जागा
By नम्रता फडणीस | Updated: December 14, 2024 19:54 IST2024-12-14T19:54:10+5:302024-12-14T19:54:10+5:30
वकिलांनी चक्क नवीन इमारतीच्या समोर रस्त्यावर बसून डबा खाल्ला हाेता. अखेर हा प्रश्न सुटला

न्यायालयात डबा खाण्यासाठी वकिलांना मिळाली हक्काची जागा
पुणे : शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातीलवकिलांना डब्बे खाण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी हाेत हाेती. तसेच याकडे लक्षवेधण्यासाठी वकिलांनी चक्क नवीन इमारतीच्या समोर रस्त्यावर बसून डबा खाल्ला हाेता. अखेर हा प्रश्न सुटला असून, आता डबा खाण्यासाठी वकिलांना हक्काची जागा मिळाली.
न्यायालयात उभारण्यात आलेल्या टिफीन हॉलचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या हस्ते झाले. अल्पोपहाराने व डब्बे खाऊन हॉलचा श्रीगणेशा करण्यात आला. याप्रसंगी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खामकर, उपाध्यक्ष कुमार पायगुडे, पवन कुलकर्णी, सचिव चेतन हरपळे यांसह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा व सत्र न्यायालयाचा विस्तार करण्यासाठी अग्रवाल कँटीन पाडण्यात आले आहे. हे कँटीन पाडण्यापूर्वी या ठिकाणी वकील व पक्षकारांना डब्बा खाण्यासाठी पुरेशी जागा होती. आवारात असलेल्या तीन पैकी दोन कँटीन पाडण्यात आल्याने वकीलवर्गासह पक्षकारांना डब्बा खाण्याची अडचण निर्माण झाली होती. याबाबत, वकीलवर्गाकडून पुणे बार असोसिएशनकडे वारंवार तक्रार करण्यात येत होती. तसेच, डब्बा खाण्यासाठी पुरेशी जागा मिळावी, अशी मागणी करण्यात येत होती. पाठपुरावा केल्यानंतर पुणे बार असोसिएशनने टिफीन रूमकरिता जागा मिळण्याबाबतचे निवेदन प्रमुख जिल्हा सरकारी न्यायाधीशांकडे दिले होते. न्यायालय प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाकडे याचा पाठपुरावा केला. उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यावर नवीन इमारतीच्या टेरेसवर हा टिफीन हॉल उभारण्यात आला आल्याचे ॲड. खामकर यांनी सांगितले.