वकील संघटनांना उद्घाटनांचा अधिकार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 03:16 AM2017-08-04T03:16:22+5:302017-08-04T03:16:22+5:30
कौटुंबिक न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या श्रेयवादावरून रंगलेल्या नाट्यात वकिलांच्या दोन संघटनांमध्ये जुंपलेली आहे; मात्र उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा
पुणे : कौटुंबिक न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या श्रेयवादावरून रंगलेल्या नाट्यात वकिलांच्या दोन संघटनांमध्ये जुंपलेली आहे; मात्र उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा अधिकार या संघटनांना नसल्याचे न्यायालय प्रशासनाने गुरुवारी स्पष्ट केले. उच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या अधिकारातील ही बाब असून ज्यांचा हा हक्क आहे, त्यांनी हा प्रकार गंभीरपणे घेतल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे हा विषय चिघळू लागला आहे.
उद्घाटनच्या कार्यक्रमाच्या दिवशी व्यासपीठावर कोणत्या संघटनेच्या अध्यक्षाला स्थान असावे, कोणाला या कार्यक्रमातून दूर ठेवले जात आहे, कोणती संघटना प्रमुख, यावरून वकीलवर्गात चर्वितचर्वण सुरू आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन १२ आॅगस्ट रोजी होणार आहे; मात्र त्यापूर्वीच वकिलांमध्ये शब्दाशब्दी सुरू आहे.
न्यायव्यवस्थेमध्ये वकीलही महत्त्वाचा कणा असल्यामुळे त्यांना बाजूला सारून कार्यक्रम घेता येणार नाही, असे असले तरी आता उद्घाटन कार्यक्रम घेण्याचा हक्क नेमका कोणाचा, हा प्रश्न समोर आला आहे. याविषयीचे वृत्त उच्च न्यायालयापर्यंत गेल्याचे सांगण्यात येते.
यासंदर्भात, शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील प्रशासकीय सूत्रांकडे विचारणा केली असता, हा कार्यक्रम घेण्याचा अधिकार जिल्हाप्रमुख न्यायाधीश, कुटुंब न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाच्या अधिकारातील असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींचे शिष्टमंडळ शनिवारी नवीन इमारतीची पाहणी करणार आहेत. कार्यक्रमाच्या दिवशी व्यासपीठावर कोणाला बसण्याची संधी मिळणार, कार्यक्रमाचे श्रेय कोण घेणार, हे आता शनिवारनंतरच स्पष्ट होणार आहे.