पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात तोडफोडीवेळी हलगर्जीपणा, पीएसआय निलंबित
By नितीश गोवंडे | Published: February 4, 2024 03:50 PM2024-02-04T15:50:08+5:302024-02-04T15:51:02+5:30
युवा मोर्चाच्या ६ पदाधिकाऱ्यांसह अन्य ५ ते ६ जणांवर गुन्हा दाखल...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना शनिवारी (ता. ३) संध्याकाळी घडली. संबंधित ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असतानाही बंदोबस्तावर असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाने ही बाब नियंत्रण कक्ष अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली नाही, याची गंभीर दखल घेत बंदोबस्तावर असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी याबाबतचे आदेश काढले.
सचिन शंकर गाडेकर (नेमणूक, चतु:श्रृंगी पोलिस ठाणे) असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून शुक्रवारी (ता. २) सायंकाळी रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित ‘जब वी मेट’ या नावाच्या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रामायणाचा विपर्यास केल्याच्या आरोपावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी नाटकाचा प्रयोग बंद पाडला. यावेळी मोठा गोंधळ झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास भाजप युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी जोर-जोरात घोषणा देत, शाईफेक करत ललीत कला केंद्राच्या खिडकीच्या काचा, कुंड्या फोडल्या.
यावेळी ललीत कला केंद्र (गुरुकुल) या ठिकाणी सचिन गाडेकर यांना बंदोबस्त दिलेला होता. याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना सुध्दा गाडेकर यांनी योग्य ती दखल घेतली नाही. त्याठिकाणी आरसीपी स्ट्रायकिंग बोलवली नाही. तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक आयुक्त, उपायुक्त यांच्यासह नियंत्रण कक्षालाही घडलेला प्रकार कळवला नाही. त्यामुळे वरिष्ठांना घटनेची वेळीच माहिती मिळाली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर गाडेकर यांचे सेवेतून निलंबन करण्यात आले आहे. जबाबदार पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत असताना शासकीय सेवेत सचोटी व कर्तव्यपरायणता राखणे आवश्यक असतानाही गंभीर स्वरूपाच्या हलगर्जीपणामुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
युवा मोर्चाच्या ६ पदाधिकाऱ्यांसह अन्य ५ ते ६ जणांवर गुन्हा दाखल..
भारतीय युवा मार्चाच्या निखिल राजेंद्र शाळीमकर (३४), शिवम मारूती बालवडकर (२४), किरण चंद्रकांत शिंदे (३३), सनी रमेश मेमाणे (३२), प्रतिक कुंजीर (२९) आणि दयानंद शिंदे (२६) या पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह अन्य ५ ते ६ महिला व पुरूष कार्यकर्त्यांवर ललित कला केंद्राचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गुरव पुढील तपास करत आहेत.