खोटेपणा करुन लक्ष्मण हाकेंची मागासवर्ग आयोगावर वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 07:22 PM2021-09-27T19:22:39+5:302021-09-27T19:22:50+5:30

बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांचे समर्थक बनून हाके यांनी ही बेकायदेशीर नियुक्ती मिळवली

Laxman Hake's character on backward class commission by lying | खोटेपणा करुन लक्ष्मण हाकेंची मागासवर्ग आयोगावर वर्णी

खोटेपणा करुन लक्ष्मण हाकेंची मागासवर्ग आयोगावर वर्णी

googlenewsNext
ठळक मुद्देधनगर विवेक जागृतीचा आरोप - हाके प्राध्यापक नसून ठेकेदार

पुणे : “राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके हे प्राध्यापक नसून ठेकेदार आहेत. त्यांनी पद मिळवण्यासाठी शासनाला खोटी माहिती दिली. या माहितीची सत्यता न तपासताच त्यांना सचिव दर्जाचे पद बहाल केले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांचे समर्थक बनून हाके यांनी ही बेकायदेशीर नियुक्ती मिळवली,” असा आरोप धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

प्रा. लक्ष्मण हाके यांनी राज्य शासनाकडे सादर केलेले परिचयपत्र, तसेच विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे ढोणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत हा आरोप केला. “राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांच्या कागदपत्रांची पडताळणी, तसेच चारित्र्याची पडताळणी करून अपात्र सदस्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी गांधी जयंतीपासून पुण्यातील राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहे,” असे ढोणे यांनी सांगितले.

हाकेंनी जन्मतारीख का दडवली?

“लक्ष्मण हाके यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी सलगी करून हे पद मिळवल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. त्यामुळेच हाके यांच्या सर्व अपात्रतांकडे दुर्लक्ष करण्यात आले. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे खोट्या माहितीकडे कानाडोळा करण्यात आला. यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिली आहे. हाके यांनी परिचयपत्रात जन्मतारीख दडवली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाची वयोमर्यादा किमान ४५ व कमाल ६० वर्षे आहे. मात्र, हाके यांचे वय ४५ पेक्षा कमी असून ते कळून येऊ नये म्हणून त्यांनी जन्मतारीख लिहिलेली नाही,” असे ढोणे म्हणाले.

आंदोलनाच्या प्रमुख मागण्या

“राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती कायदेशीर व्हावी. आयोगाला पायाभूत सुविधा व पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी ४३१ कोटींचा निधी तातडीने वितरित करावा,” या प्रमुख मागण्या असल्याचे विक्रम ढोणे यांनी सांगितले.

Web Title: Laxman Hake's character on backward class commission by lying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.