वंचितमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण मानेंचा नवीन पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 05:44 PM2019-07-24T17:44:15+5:302019-07-24T17:46:00+5:30
वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण माने यांनी नव्या पक्षाची घाेषणा केली आहे.
पुणे : अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज हाेऊन वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण माने यांनी नवीन पक्षाची घाेषणा केली आहे. महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी असे या नव्या पक्षाचे नाव असणार आहे. पुण्यातील अराेरा टाॅवर येथे आयाेजित पत्रकार परिषदेत माने यांनी माहिती दिली. काॅंग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील देखील त्यांच्यासाेबत हाेते.
प्रकाश आंबेडकर यांची कार्यपद्धती पटत नसल्याने तसेच लाेकसभेला काॅंग्रेस, राष्ट्रवादीसाेबत आघाडी न केल्यामुळे झालेले नुकसान विधानसभेला हाेऊ नये यासाठी माने यांनी वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला हाेता. त्याचबराेबर वंचितमध्ये आरएसएसचा हस्तक्षेप हाेत असल्याचा आराेप देखील त्यांनी केला हाेता. वंचितमधून बाहेर पडल्यानंतर माने काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष हाेते. अखेर मानेंनी नव्या पक्षाची आज घाेषणा केली.
महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी असे मानेंच्या नवीन पक्षाचे नाव असणार आहे. येत्या विधासभेला काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीसाेबत आघाडी करणार असल्याची माहिती देखील माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबराेबर अनेक पक्ष संघटना साेबत येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.