लक्ष्मीपूजनाने उत्साह, आतषबाजीने आसमंत उजळला, घरोघरी उत्साहात पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 02:38 AM2017-10-20T02:38:25+5:302017-10-20T02:38:48+5:30
लक्ष्मीच्या सोनपावलांचे चैतन्यमयी वातावरणात पूजन करून लक्ष्मीपूजनाचा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला. प्रकाशाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत मनामनातला अंधार दूर करणा-या प्रकाशोत्सवाचे उत्स्फूर्त वातावरणात स्वागत झाले.
पुणे : लक्ष्मीच्या सोनपावलांचे चैतन्यमयी वातावरणात पूजन करून लक्ष्मीपूजनाचा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला.
प्रकाशाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत मनामनातला अंधार दूर करणा-या प्रकाशोत्सवाचे उत्स्फूर्त वातावरणात स्वागत झाले. दीपमाळांची रोषणाई, पणत्यांचा झगमगाट, दारासमोरच्या रांगोळ्यांनी वातावरण मंगलदायी बनले होते. या निमित्ताने घराघरात, दुकानात, कार्यालयात लक्ष्मीपूजन करण्यात आले. या वेळी नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
अमावास्येच्या रात्री जिल्ह्याचा सर्व भाग आसमंतात प्रकाशात न्हाऊन निघाला होता. अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन साजरे होते. त्यासाठी पुणेकर बुधवारपासूनच सज्ज होते. खरेदीसाठी बाजारपेठ फुलली होती. सायंकाळच्या लक्ष्मीपूजनाची तयारी दुपारपासूनच केली जात होती. सूर्य पश्चिम क्षितिजाकडे झुकू लागताच दारांवर पिवळ्याधमक, केशरी झेंडूच्या माळा लावण्यात आल्या. अंगणात रांगोळी काढण्यात आली. सकाळनंतर मालविलेले आकाशदिवे पुन्हा झगमगू लागले. अमावस्या अशुभ मानली जाते. मात्र आश्विन अमावस्या आनंदी असते. त्यामुळे व्यापारीवर्गाने दुपारीच व्यवहार बंद करून पूजेची तयारी सुरू केली. सायंकाळी महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये पूजेचे वातावरण दिसत होते.
घरोघरच्या आणि व्यापारी पेढ्यांमधील पूजा पूर्ण होताच फटाक्यांच्या धमाक्याचे आवाज ऐकू येऊ लागले. आश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मीचा सर्वत्र संचार असतो, अशी आणि आजच्या रात्री घरातील केर झाडून बाहेर टाकावा, दारिद्र्यनिस्सारण करावे, अशी श्रद्धा असल्याने रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांंमध्ये जाग होती.
पाडव्याचा उत्साह
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा वा पाडवा याला दिवाळी पाडवा असेही म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त. याला गोवर्धन प्रतिपदाही म्हटले जाते. याच दिवशी विक्रमादित्याला राज्याभिषेक झाला. बळीच्या बंधनातून विष्णूने सर्वांना मुक्त केले तोच हा दिवस. या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. सुवासिनी आपल्या पतीला ओवाळतात. पती आपल्या पत्नीला नवीन वस्तू, धन यांची ओवाळणी घालतात. व्यापारी लोक या दिवसापासून नवे व्यापारी वर्ष सुरू करतात. आपल्या जमाखर्चाच्या नवीन वह्या या दिवसापासून सुरू करतात. नवीन दुकान, शाळा वगैरे या दिवशी सुरू केल्या जातात.
शनिवारी भाऊबीज
कार्तिक शुद्ध द्वितीया, यम द्वितीयेला भाऊबीज साजरी करतात. भावाबहिणींच्या पवित्र प्रेमाचा हा दिवस. या दिवशी बहीण आपल्या भावाला मंगलस्नान घालते, त्याला जेवायला बोलावते. आरती ओवाळून त्याची पूजा करते. त्याला प्रेमाचा टिळा लावते. टिळा हा बहिणीची निरपेक्ष, नि:स्वार्थी प्रेमभावना व्यक्त करतो. भावाची पूजा ही यमराजाच्या म्हणजेच मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी, तो चिरंजीवी व्हावा, ही त्यामागची भावना असते. भाऊ नसल्यास चंद्राला भाऊ मानून त्याला ओवाळण्याची प्रथा आहे. चंद्र हा भगिनी वर्गाचा भाऊ बनल्याने स्वाभाविकपणे तो आपल्या आईचा भाऊ म्हणजे आपला मामा. म्हणूनच त्याला ‘चंदामामा’ म्हणण्याची प्रथा आहे. बहिणीने भावाला ओवाळल्यानंतर भाऊ तिला वस्त्र-अलंकार वा पैसे ओवाळणी म्हणून घालतो. याच दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला म्हणून या दिवसाला यमद्वितीय असे म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात. असे केल्यामुळे त्यावर्षीतरी यमापासून भय नसते, असा समज आहे.
देवी पार्वतीने शंकराला पाडव्याच दिवशी द्यूतात हरवले. म्हणून या प्रतिपदेला ‘द्यूतप्रतिपदा’ असेही म्हणतात. श्रीकृष्णाने याच दिवशी गोवर्धन पर्वत उचलून गोकुळाचे रक्षण केले, म्हणून या दिवशी गोवर्धन पूजा करण्याचीही प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा, फुले खोचतात व कृष्ण, गोपाळ, गाई, वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्या सर्वांची पूजा करतात. ‘दिन दिन दिवाळी । गाई म्हशी ओवाळी । गाई म्हशी कोणाच्या। लक्ष्मणाच्या’ अशी गाणी गात गाई-म्हशींना ओवळून त्यांची मिरवणूक काढली जाते.