लक्ष्मीपूजनाने सजली दिवाळीची सायंकाळ
By admin | Published: November 12, 2015 02:38 AM2015-11-12T02:38:27+5:302015-11-12T02:38:27+5:30
दिवाळीतील महत्त्वाचा मानला जाणारा लक्ष्मीपूजनाचा दिवस शहरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळच्या अभ्यंगस्नानानंतर नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत फराळ
पुणे : दिवाळीतील महत्त्वाचा मानला जाणारा लक्ष्मीपूजनाचा दिवस शहरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळच्या अभ्यंगस्नानानंतर नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत फराळ आणि जेवणाचा आनंद लुटून सायंकाळी पूजेसाठी घरातील सर्व मंडळी एकत्रित जमल्याचे चित्र घरोघरी पाहायला मिळाले.
वर्षभर मिळालेल्या संपत्तीची पूजा करून हा दिवस साजरा केला जातो. व्यापाऱ्यांच्या दृष्टीने आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होते. त्यामुळे हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेऊन, तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. लक्ष्मी हे स्वच्छतेचे प्रतीक मानले जात असल्याने अशाप्रकारे केरसुणीची पूजा करण्यात येते. त्यापद्धतीने घरोघरी अशी पूजा करण्यात आली.
घरातील सोने, नवीन वस्तू, हिशेबाच्या वह्या, बँकेची महत्त्वाची कागदपत्रे यांची मनोभावे पूजा केली जाते. येणाऱ्या वर्षात लक्ष्मीची आपल्यावर अशीच कृपा राहू दे, यासाठी प्रार्थना करण्याची पद्धत
आहे. त्यानुसार नागरिकांनी देवाकडे येणारे वर्ष भरभराटीचे जाऊ दे, अशी प्रार्थना केली.
या वेळी चांदीची व सोन्याची लक्ष्मी असलेली नाणी पूजली जातात. त्यांना धने व गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला जातो. लाह्या या समृद्धीचे प्रतीक मानल्या जात असल्याने लाह्या आणि बत्तासे यांचाही नैवेद्य दाखविण्यात येतो. त्याप्रमाणे साग्रसंगीत पूजा घरोघरी करण्यात आल्याचे चित्र होते. सोसायटीतील सुवासिनींना बोलावून त्यांना हळदी-कुंकू लावून हा प्रसाद दिला जातो. शहरातही फ्लॅटसंस्कृतीचे प्रमाण वाढले असले, तरीही अशाप्रकारे महिला एकमेकींकडे जाऊन सण साजरा करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या दिवशी दारात रांगोळी काढून पणत्यांनी परिसर उजळून टाकण्यात आला होता. आकाशकंदील आणि पणत्यांच्या प्रकाशात जीवनातील अंधकार दूर होऊन जीवन प्रकाशमान व्हावे, अशी यामागील मुख्य धारणा असते. आश्विन शुद्ध अमावस्या म्हणजेच ‘लक्ष्मीपूजन’ हा दिवस त्याला अपवाद असून,
तो चांगला
मानला जातो.
सर्व अघटित
घटना मागे सारून नव्याने जीवनाची सुरुवात करण्याच्या दृष्टीने या दिवसाकडे पाहिले जाते. एरवी सायंकाळच्या वेळी केर काढत
नाहीत; मात्र या दिवशी पूजा केलेल्या केरसुणीने सायंकाळी केर काढून घरातील अनिष्ट गोष्टी घराबाहेर घालवायच्या, अशीही धारणा रुढ आहे.