ढिम्म प्रशासन आणि ठेकेदाराचा कामचलाऊपणा ; कोंढणपुर रस्ताच वाहून गेल्याने आठ गावांचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 07:50 PM2020-09-21T19:50:34+5:302020-09-21T19:54:10+5:30
गेल्यावर्षी २५ सप्टेंबरला झालेल्या पावसामध्येसुद्धा हा रस्ता वाहून गेला होता.
खेड शिवापूर : ढिम्म प्रशासन आणि कामचलाऊ ठेकेदार हे आपल्याकडे विकसन मार्गातील खरे मोठे अडथळे आहेत. त्यांच्या हलगर्जीपणाचा भुर्दंड हा नागरिकांना सोसावा लागतो.याचाच प्रत्यय शिवगंगा खोऱ्यातील पुणे-सातारा महामार्ग ते कोंढणपुर हा रस्ता आज दुपारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे आलेल्या पुरात आर्वी (ता. हवेली) येथील सागराची ताल याठिकाणी रस्ता वाहून गेला.यामुळे घेरा सिंहगड परिसरातील कोंढणपूर, राहटवडे, अवसरवाडी, कल्याण, शिवतारेवाडी व भिलारवाडी पेठ या आठ गावांचा संपर्क तुटला आहे.
गेल्या वर्षी २५ सप्टेंबर यादिवशी झालेल्या पावसामध्ये याच ठिकाणी रस्ता वाहून गेला होता. त्यावेळी ठेकेदाराकडून तात्पुरती व्यवस्था केली गेली होती. तातडीने याठिकाणी पूल बांधण्याचे काम सुरु होईल व तो पुल लवकरात लवकर पूर्ण होईल अशा प्रकारची माहिती संबंधित विभागाने नागरिकांना हमी दिली होती. मात्र आजपर्यंत एक वर्षे उलटून गेल्यानंतरही याठिकाणी पुलाचे काम अर्धवटच केलेले आहे. या अर्धवट पुलापासून वरील गावांना जाण्यासाठी चार सिमेंटच्या नळ्या टाकून एक एक छोटासा तात्पुरता रस्ता या ठिकाणी करण्यात आला होता. मात्र, संबंधित रस्ते ठेकेदाराकडून या कामांमध्येही कुठलीच प्रगती नसून मागील वर्षीप्रमाणे आजही काम अपुरेच आहे. नागरिकांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करूनही संबंधित विभागाकडून या रस्त्यात ठेकेदाराला काम पूर्ण करण्याबाबत कुठल्याही प्रकारची सूचना किंवा तंबी देण्यात आलेली नाही.
आता हा रस्ता वाहून गेल्या कारणाने वरील आठ गावांचा संपर्क तुटलेला आहे.त्यामुळे यापुढेही याठिकाणी मोठ्या अपघात होण्याचीही शक्यता आहे. संबंधित ठेकेदारावर पांघरूण घालून अजून किती दिवस नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागेल याबाबत नागरीकांमध्ये संभ्रम आहे.