नेते म्हणतात...

By admin | Published: February 24, 2017 03:56 AM2017-02-24T03:56:14+5:302017-02-24T03:56:14+5:30

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला हद्दपार करून विकासाचे राजकारण करण्यासाठी पुणेकरांनी

The leader says ... | नेते म्हणतात...

नेते म्हणतात...

Next

पुणेकरांचा विकासाला कौल
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला हद्दपार करून विकासाचे राजकारण करण्यासाठी पुणेकरांनी आमच्यावर विश्वास टाकला आहे. तो आम्ही सार्थकी लावू . भारतीय जनता पक्षाचा हा महाविजय कार्यकर्त्यांचा आहे. अंगमेहनत करून त्यांनी दाखविलेल्या निष्ठेचा आहे. पुणेकरांनी विकासाला कौल दिला आहे. केन्द्रात, राज्यात आणि आता पालिकेत सर्वत्र जनाधार मिळाल्याने सर्वांना बरोबर घेऊन आम्ही पुण्याचा सर्वांगीण विकास करू. पुणेकरांनी आम्हाला राज्यात व केंन्द्रात मंत्रीपदे दिली. आमदार खासदारपदही दिले परंतु आजपर्यंत पुण्याचे महापौरपद दिले नव्हते. ते यावेळी देऊ केले आहे. मेट्रोसह, विकास आराखड्याची अंमलबजावणी, चोवीस तास पाणी, नदी सुधारणा, कचरामुक्त पुणे, रिंगरोडची पूर्तता, स्मार्ट पुणे यासारख्या अनेक योजना मार्गी लावणे सोपे झाले आहे विरोधकांनी मात्र सातत्याने नकारात्मक मुद्दे प्रचारात आणले.आम्हाला बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला. गुंडांची पार्टी म्हणून आमची अवहेलना केली. सभा फ्लॉप झाल्याचा कांगावा केला. जाहीरनामा चोरल्याचा आरोप केला. सिंहगडावर झालेल्या शपथविधीवर हल्लाबोल केला. अनवधानाने केलेल्या विधानाबाबतची व्हिडीओ क्लिप व्हायरल केली. समंजस पुणेकरांनी या टीकेला मतपेटीद्वारे उत्तर दिले आहे. " कारभारी बदला पुणे बदलेल " या आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.
- गिरीश बापट, पालक मंत्री



नियोजनबद्ध यंत्रणेमुळे यश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महापालिका निवडणुकीचे तिकीट वाटप झाले. प्रत्येक प्रभागनिहाय नियोजनबद्ध नेटवर्कच्या माध्यमातून राबविलेल्या यंत्रणेमुळेच 92 प्लसचा फॉमुर्ला पुण्यात यशस्वी झाला. मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर पक्ष वाढविण्याची आणि महापालिकेत सत्ता आणण्यासाठी काम करण्याची जबाबदारी दिली होती. ती मी चोखपणे पार पाडली. प्रभागनिहाय नियोजनबद्ध काम करणारी स्वतंत्र यंत्रणा राबविली. त्यामार्फत मतदारांपर्यंत पक्ष व विकासाचे धोरण पोहचविण्याचे काम आमच्या कार्यकत्यार्ने प्रामाणिकपणे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकासाची छबी आहेत. गेल्या 15 वर्षांत रखडलेली सर्व विकासकामे मार्गी लावून पुणेकरांसाठी सुंदर व स्वच्छ शहर बनविण्यासाठी आम्ही सर्वजण काम करू.
- संजय काकडे, खासदार


‘भाजपचा विजय हा आनंदाचा दिवस आहे. आपल्याला अपेक्षित असलेले शहर विकसित करण्यासाठी भाजप वाटचाल करणार आहे. सक्रिय आणि जागरुन पुणेकरांनी भाजपला कौल देऊन डोळस निर्णय घेतलेला आहे. आम्हाला दिलेले उत्तरयित्व आम्ही निश्चित पार पाडू. प्रत्येक माणसाला घर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पाण्याची सोय आणि चांगले शहर विकसित करण्याच्या प्रयत्न असेल.’
- अनिल शिरोळे, खासदार


जनमताचा कौल आम्ही स्विकारत आहोत. युती असल्याने आम्हाला पक्ष म्हणून वाढ करण्यावर मर्यादा होत्या. युती तोडल्यामुळे शिवसेना प्रथमच संपुर्ण शहरात पोहचली. कार्यकर्त्यांना निवडणूक लढवता आली. याचा फायदा आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे. त्यांनी स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे आमच्या सहकार्याचा काही प्रश्नच येत नाही.
- विनायक निम्हण, शहराध्यक्ष, शिवसेना


सर्व नैतिक मुल्य पाळून आम्ही निवडणूक लढवली. भाजपाच्या बाबतीत काय आरोप होत होते ते पुणेकरांना माहिती आहे. तरीही त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान होत असेल तर सर्वच राजकीय पक्षांनी चिंतन करावे अशीच ही गोष्ट आहे. एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही पालिकेत कार्यरत राहू. एका बिल्डरच्या हातात महापालिकेची सत्ता द्यायची का? असे आरोप होत होते. परंतु, निकालावरून पुणेकरांनी त्याकडे लक्ष दिलेले दिसत नाही.
- वंदना चव्हाण, खासदार,
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस



भाजपच्या जाहीर- नाम्याच्या माध्यमातून दिलेली ग्वाही पूर्ण केली जाणार आहे. सिंहगडावर थपथ घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारवाड्यावरुन महापालिकेकडे कूच केले जाणार आहे. १५ मार्चपूर्वी निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींचे म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाणार आहे.’
- योगेश गोगावले,
शहराध्यक्ष, भाजपा



भाजपाचा हा विजय सत्तेचा गैरवापर करून मिळविलेला विजय आहे. सरकारी अधिकारी, पोलीस यंत्रणा व सत्तेतून मिळालेला पैसा याचा वापर या निवडणूकीत झालेला स्पष्ट दिसतो आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना चिन्ह नाकारणे, आम्ही पोलिसांकडे केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे हे अयोग्य आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या महापालिकेतील कामगिरीवर लक्ष ठेवू.
- रमेश बागवे,
शहराध्यक्ष, कॉँग्रेस

Web Title: The leader says ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.