नेते चालतील, पण व्यासपीठावर सत्ता साहित्यिकांचीच -संमेलनाध्यक्ष भारत सासणे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 07:36 AM2022-04-21T07:36:14+5:302022-04-21T07:37:01+5:30
उदगीरमध्ये उद्या (दि. २२) पासून ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे. संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांची, संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी खास 'लोकमत'साठी घेतलेली मुलाखत.
पुणे - ‘राजा तू चुकलास’ असे बडोद्याच्या साहित्य संमेलनात सांगणारे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी उदगीर येथे उद्या, शुक्रवारपासून रंगणाऱ्या ९५ व्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांना तुमच्या भाषणाकडे सर्वांप्रमाणे माझेही लक्ष असल्याचे सांगताच सासणे यांनी ‘उद्याची वाट बघा, मी थेटपणे बरेच काही बोलणार आहे, असे सूचक वक्तव्य करीत सर्वांच्याच उत्सुकतेत भर पाडली. राजकीय नेते व्यासपीठावर चालतील; पण सत्ता असेल ती साहित्यिकांचीच, या भूमिकेकडे त्यांनी लक्ष वेधले.
भारत सासणे आणि लक्ष्मीकांत देशमुख हे दोघेही निवृत्त सनदी अधिकारी अन् संमेलनाचे आजी-माजी अध्यक्ष. बुधवारी दोघेही ’लोकमत’च्या व्यासपीठावर एकत्र आले, ते काहीशा वेगळ्या भूमिकेतच! देशमुख यांनी बूम हातात घेऊन भारत सासणे यांची मुलाखत घेत त्यांना विविध विषयांवर बोलते केले. आजवरच्या संमेलनाच्या इतिहासात माजी संमेलनाध्यक्षाने नियोजित संमेलनाध्यक्षाची मुलाखत घेण्याची ही कदाचित पहिलीच वेळ. ‘लेखकाने सत्य बोलले पाहिजे हे खरंतर लेखकाला सांगणे योग्य नाही. जो सत्य मांडत नाही तो लेखकच नाही. मात्र, अलीकडे लेखकाचे कथन सीमित होत आहे. बोलायचे तिथे उच्चरवाने बोलले पाहिजे याचा सासणे यांनी पनुरुच्चार केला.
राजकारण्यांचा संमेलनाच्या मंचावरील उपस्थितीबाबतचा विषय देशमुख यांनी छेडला अन् सासणे यांनी पूर्वी संमेलनाच्या मंचावर राजकीय नेत्यांचा वावर कधी नव्हता? असा उलट प्रश्न केला.