अपयशाचीही जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे : नितीन गडकरींचा इशारा कोणाकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 06:13 PM2018-12-22T18:13:24+5:302018-12-22T18:14:37+5:30
यशाप्रमाणेच अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे असे वक्तव्य पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
पुणे : यशाप्रमाणेच अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे असे वक्तव्य पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. तीन राज्यांच्या निवडणुकीत पराभव झाल्यावर आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी गडकरी पंतप्रधानपदाचे दावेदार असल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे. गडकरी यांनी पंतप्रधानपदात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केले असले तरी अशा परिस्थितीत त्यांचे हे वक्तव्य कोणासाठी आहे याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
पुण्यातील जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेडच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार अनिल शिरोळे, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अॅड. साहेबराव टकले, विजय ढेरे या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात बँकींग क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या ३६ बँकांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.
यावेळी गडकरी म्हणाले की, यशाचे अनेक बाप असतात. पण अपयश अनाथ असते.त्यामुळे यशाप्रमाणेच अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, येता काळ बँकींग क्षेत्रासाठी अडचणीचा आहे. त्यामुळे कायदा वाकवा मात्र, तो मोडणार नाही याचे भान ठेवा. एखादी चूक झाल्यास नागरीक जाब विचारतील. सहकार क्षेत्राविषयी लोकांमध्ये विश्वास कसा निर्माण होईल हे पाहिले पाहीजे. आज एकही खाते अनुत्पादित (एनपीए) होणारच नाही, असे नाही. याचा अर्थ कोणा संचालकांनी चुकीचा व्यवहार करु नये. अशा संचालकांना शिक्षा व्हायलाच हवी. मात्र, सरसकट सर्व संचालकांना जबाबदार धरुन चालणार नाही. सहकारी बँकीग क्षेत्राने या पुढे व्यावसायिक दृष्टीकोन (प्रोफेशनल अॅप्रोच) ठेवून काम केले पाहीजे.