राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाठ फिरवल्याने एकतर्फी
By Admin | Published: April 27, 2015 11:51 PM2015-04-27T23:51:40+5:302015-04-27T23:51:40+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदापूर तालुक्यातील स्थानिक नेत्यांनी सुरुवातीपासूनच अंग काढून घेतल्याने कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी झाली.
इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदापूर तालुक्यातील स्थानिक नेत्यांनी सुरुवातीपासूनच अंग काढून घेतल्याने कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी झाली.
नीरा-भीमा कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळविलेले काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी ‘कर्मयोगी’च्या निवडणुकीतदेखील बाजी मारली. चार जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित जागांवर विरोधकांचे पानिपत झाले. त्यांना अनामत रकमादेखील वाचवता आल्या नाहीत. स्थानिक पातळीवरील तडजोडींमुळे कर्मयोगीच्या निवडणुकीवर हर्षवर्धन पाटील यांनी गड कायम राखला.
नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक हर्षवर्धन पाटील यांनी बिनविरोध पार पाडली. त्यानंतर कर्मयोगी कारखान्याची निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. इंदापूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला.
दत्तात्रय भरणे आमदार झाले. त्यामुळे कर्मयोगीची निवडणूक पाटील यांना अवघड जाईल, असे बोलले जात होते. परंतु, त्याच वेळी छत्रपती कारखान्याची निवडणूक होती. कर्मयोगी आणि ‘छत्रपती’च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलिखित तडजोड कॉँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची झाली असल्याचे चित्र होते. परंतु, निवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी प्रयत्न झाले.
मात्र, राष्ट्रवादीचे प्रमुख पुढारी या कारखान्याच्या निवडणुकीतून बाहेर पडले. त्याचा फायदा पाटील यांना झाला. जे विरोधक म्हणून निवडणूक रिंगणात राहिले, त्यांना मोठ्या मतांच्या फरकाने निवडणुकीतून पराभव पत्कारावा लागला. या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै. शंकरराव पाटील यांची कन्या पद्माताई भोसले यांनादेखील निवडणूक रिंगणात उतरवले. त्यामुळे विरोधकांचा मुद्दाच संपुष्टात आला. दोन्ही कारखान्यांवर पाटील यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
कर्मयोगी कारखान्याची उमेदवार अर्ज दाखल करण्यापासून राष्ट्रवादीच्या माध्यमातून स्वतंत्र पॅनलद्वारे काँग्रेसला आव्हान उभे केले जाणार, असे सांगितले जात होते. मात्र, त्याच दरम्यान राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळी, गटबाजी उफाळून आली. प्रमुख पुढाऱ्यांनी निवडणुकीतून अंग काढून घेतले. निवडणूक बिनविरोध करण्याची चाचपणीदेखील झाली. मात्र, उमेदवारी माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी गटबाजी, मानापमान उफाळून आला. बिनविरोधच्या पर्यायात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून प्रस्ताव देण्यात आले. अखेर तडजोड झालीच नाही. राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. चार जागा बिनविरोध झाल्या. निष्प्रभ ठरणारा गट निवडणूक रिंगणात राहिला.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीदेखील कर्मयोगीपेक्षा छत्रपती कारखान्याकडे लक्ष दिले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या कारखान्यात या निवडणुकीच्या निमित्ताने लक्ष द्यायचे नाही, असेच चित्र दिसून आले. त्याचा हर्षवर्धन पाटील, अजित पवार यांना दोन्ही कारखान्यांत फायदा झाल्याचे दिसून आले. दिग्गज उमेदवार नसल्याने सुरुवातीपासून निवडणूक एकतर्फी ठरली. हे निवडणूक निकालावरूनदेखील स्पष्ट झाले. निवडणूक एकतर्फी होती तरी हर्षवर्धन पाटील यांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला.
राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह नेते अजित पवार यांनी प्रचार सभाही घेतली नाही अथवा या कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात काहीच बोलले नाहीत. त्यातूनच अंतर्गत राजकीय तडजोडीच्या चर्चेला दुजोरा मिळाला. तालुक्यातील दोन्ही मोठ्या कारखान्यांवर एकहाती सत्ता कायम ठेवून हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा तालुक्यावरील पकड मजबूत करण्यावर भर दिला आहे, हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
आजचा विजय संचालक मंडळाच्या कामाची पावती
४छत्रपती कारखाना निवडणुकीत आमचा आज झालेला विजय हा मागील पाच वर्षांत केलेल्या कामाची पावती आहे. कारखान्यासमोर विविध अडचणी असतानादेखील सभासद हितासाठी संचालक मंडळाने नेहमीच प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाचे हे यश आहे, अशी प्रतिक्रिया विद्यमान अध्यक्ष अमरसिंह घोलप यांनी व्यक्त केली.
सभासदांना संचालक मंडळाच्या कामाची जाण
४अतिरिक्त उसाच्या प्रश्नात संचालक मंडळाने लक्ष घालून सभासदांचे नुकसान होणार नाही, याची संचालक मंडळाने काळजी घेतली. सभासदांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा ऊसदर कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नसताना चांगला दर देण्याचा प्रयत्न केला. सर्वच बाजूंनी संचालक मंडळाने प्रभावी काम केले.
४साहजिकच सभासदांनी याची जाण ठेवून आम्हाला मतदान केले. त्यामुळे आजचा विजय सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
४‘छत्रपती’चा आजचा विजय सर्वांनी राबविलेल्या सामूहिक प्रभावी प्रचार यंत्रणेचे यश आहे. कारखाना सभासदांच्या विविध प्रश्नांसाठी संचालक मंडळाने नेहमीच सकारात्मक प्रयत्न केले. सभासदांच्या विश्वासाला कारखान्याचा कारभार करताना कधीही तडा जाऊ दिला नाही. त्यामुळे सभासदांनी हा विश्वास नेहमीच जपला. प्रत्येक निवडणुकीत त्याचे फळ विजयाच्या रूपाने मिळते. यंदाची निवडणूकसुद्धा याच विश्वासाचे फलित आहे, अशी प्रतिक्रिया माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांनी व्यक्त केली.