नोटाबंदीविरोधात नेते उतरले रस्त्यावर
By admin | Published: January 10, 2017 03:56 AM2017-01-10T03:56:43+5:302017-01-10T03:56:43+5:30
पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पक्षाच्या विविध संघटनांनी शहराच्या विविध ठिकाणी नोटाबंदीच्या चुकीच्या
काँग्रेसचा घंटानाद
पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पक्षाच्या विविध संघटनांनी शहराच्या विविध ठिकाणी नोटाबंदीच्या चुकीच्या अंमलबजावणीच्या विरोधात ‘घंटानाद’ व ‘थाळीनाद’ आंदोलन केले़ युवक काँग्रेसच्या वतीने अलका टॉकीजजवळील टिळक चौकात आंदोलन करण्यात आले़
शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘नोटाबंदीच्या अंमलबजावणीचे ६० दिवस उलटूनही देशाची अर्थव्यवस्था ठप्प आहे़ लहान व्यावसायिक व उद्योगांना या नोटाबंदीचा मोठा फटका बसला आहे़ अनेक कामगार, रोजंदारीवर काम करणारे मजूर बेरोजगार झाले आहेत़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २ कोटी नवीन रोजगार निर्माण करणार असल्याचे आश्वासन दिले होते; परंतु नोटाबंदीमुळे १५ कोटी कामगार बेरोजगार झाले आहेत़’’ माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने अनेक निर्बंध आणल्याने शेतकऱ्यांना कर्ज मिळविणे कठीण झाले आहे़ शेतीमालाला योग्य तो भाव मिळत नाही़’’ युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ़ विश्वजित कदम म्हणाले, ‘‘नोटाबंदीचा हेतू साध्य झालेला नाही़ काळ्या पैशांवर आळा घालण्याचा प्रयत्न असफल झाला आहे़ देशातची अर्थव्यवस्था कोलमडली आहे़’’
या वेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड़ अभय छाजेड यांचे भाषण झाले़ या वेळी उपमहापौर मुकारी अलगुडे, आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार उल्हास पवार, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विकास लांडगे, देविदास भन्साळी, श्रीरंग चव्हाण, आबा बागुल, रामभाऊ बराटे, उमेश कंधारे, शिवाजी बांगर, संगीता तिवारी, सतीश मोहोळ, विक्रम खन्ना, राधिका मखामले, मुकेश धिवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते़
नरपतगीर चौकात सेवादल व एनएसयूआयतर्फे घंटानाद करून आंदोलन करण्यात आले़ या वेळी प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, सेवादल अध्यक्ष रवींद्र म्हसकर, एनएसयूआयचे अध्यक्ष भूषण रानभरे, अमीर शेख, नगरसेविका लता राजगुरू, अविनाश बागवे, लक्ष्मी घोडके, सदानंद शेट्टी, मुख्तार शेख, गोपाळ तिवारी, सुजीत यादव, विद्या भोकरे, नरेश नलावडे आदी उपस्थित होते़ जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने मंडईतील सुभानशहा दर्गा येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले़ या वेळी महिला काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनाली मारणे, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे, अंजनी निम्हण, भारती कोंडे, अनिल सोंडकर, नारायण चव्हाण, विलास वाडेकर, मिलिंद काची, अजित दरेकर, राजू शेख, बतुल आपा, शशिकला बोरकर, अनुपमा जोशी, शोभा खोले, लक्ष्मी आरडे, स्वाती कथ्थलकर, सीमा सावंत, गीता तारू, सुमन इंगवले, आयशा फरास आदी उपस्थित होते़
राष्ट्रवादीचा जनआक्रोश
पुणे : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी मंडई येथील टिळक पुतळयाजवळ जनआक्रोश आंदोलन केले. सर्व विधानसभा मतदारसंघांत आंदोलन करून कार्यकर्ते टिळक पुतळा इथे एकत्र आले.
या वेळी शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, आमदार अनिल भोसले, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, अॅड. म. वि. अकोलकर, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, दीपक मानकर, वासंती काकडे उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ‘‘मोदींनी दिलेल्या ५० दिवसांच्या आश्वासनानंतरही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही आणि ती यायला किती वेळ लागणार, याचीही सरकारकडून कोणतीही तयारी दिसत नाही. ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, यासाठी हे व्यापक जनआंदोलन करण्यात आले आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वागत केले होते; परंतु दुर्दैवाने या निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची कोणतीही पूर्वतयारी शासनाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत देशातील करोडो नागरिकांना प्रचंड आर्थिक तणावाला सामोरे जावे लागले. देशातील कृषी व्यवस्था मोडकळीस आली, कष्टकरी व असंघटित कामागारांवर बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आली. शेतमालाचे भाव कोसळले, छोट्या व्यावसायिकांचे धंदे बंद पडले तर मोठ्या उद्योगांवर कामगारकपातीची वेळ आली.’’
खडकवासला मतदारसंघात धायरी फाटा येथे, कसबा मतदारसंघात विश्रामबागवाड्याजवळ, हडपसर मतदारसंघात गांधी चौकात शिवाजीनगर मतदारसंघात सिमला आॅफिस चौकात, वडगावशेरी मतदारसंघात खराडी बायपास रोडवर, कसबा मतदारसंघात सहकारनगर येथे, कॅन्टोन्मेंट मतदारसंघात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, पर्वती मतदारसंघात सारंग चौक येथे आंदोलन करण्यात आले. सामन्यांना हजार-दोन हजार रुपयांसाठी रांगेत उभे राहावे लागत असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यांना या वेळी दोन मिनिटे शांत उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.