राजकीय फायद्यासाठी नेते महाराष्ट्र अन् कर्नाटक वाद उकरून काढतात : डॉ. एस. एल. भैरप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 09:20 AM2024-07-04T09:20:33+5:302024-07-04T09:22:48+5:30

नॅशनल बुक ट्रस्ट, पुणे पुस्तक महोत्सव आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीने बुधवारी (दि. ३) डॉ. भैरप्पा यांच्या पाच दशकांतील साहित्यातील योगदान संवादातून उलगडले...

Leaders stir up Maharashtra and Karnataka disputes for political gain: Dr. S. L. Bhairappa | राजकीय फायद्यासाठी नेते महाराष्ट्र अन् कर्नाटक वाद उकरून काढतात : डॉ. एस. एल. भैरप्पा

राजकीय फायद्यासाठी नेते महाराष्ट्र अन् कर्नाटक वाद उकरून काढतात : डॉ. एस. एल. भैरप्पा

पुणे :महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये भाषेच्या देवाण-घेवाणीतून एक अनुबंध तयार झाला आहे. दोन्ही राज्यांच्या संस्कृतीत फारसा फरक नाही. केवळ राजकीय नेते निवडणुका तोंडावर आल्या की, महाराष्ट्र आणि कर्नाटक वाद उकरून काढतात. इतर वेळी शांतता असते, अशा शब्दांत थेट नामोल्लेख न करता बेळगाव सीमा प्रश्नावरील वादावर ज्येष्ठ कन्नड लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी भाष्य केले.

नॅशनल बुक ट्रस्ट, पुणे पुस्तक महोत्सव आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीने बुधवारी (दि. ३) डॉ. भैरप्पा यांच्या पाच दशकांतील साहित्यातील योगदान संवादातून उलगडले. यावेळी ज्येष्ठ अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी, भैरप्पा यांच्या साहित्याच्या अभ्यासक डॉ. उमा रामराव, 'कशीर' कादंबरीच्या लेखिका सहना विजयकुमार यांनी भैरप्पा यांच्याशी संवाद साधला.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. समर्थ युवा फाउंडेशनचे संस्थापक आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी भैरप्पा यांचा पुणेरी, पगडी, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार केला. यावेळी साहित्य अकादमी समितीचे सदस्य डॉ. नरेंद्र पाठक उपस्थित होते.

सुरुवातीलाच भैरप्पा यांनी मी कोणतीही कादंबरी अभ्यास, संशोधन, वाचन आणि प्रवास केल्याशिवाय लिहू शकत नसल्याचे सांगितले. मी जन्मतःच सृजनशील लेखक आहे. माझ्या साहित्यात ९० टक्के सृजनशीलता आणि १० टक्के वास्तववादी चित्रण असते. विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरतमुनींचे नाट्यशास्त्र वगैरे शिकवू शकतात. परंतु सृजनशील लेखक निर्माण करू शकत नाहीत, अशी खंतही भैरप्पा यांनी व्यक्त केली.

मी जन्मतः भारतीय आहे. त्यामुळे माझे विचार आणि तत्त्व भारतीय असतील तर मी इंग्रजी साहित्याच्या प्रथा-परंपरा का पाळाव्यात? , या माझ्या प्रश्नाला टीकाकारांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. कायम वाचकच माझ्या लेखनाची प्रेरणा ठरले. माझ्या लेखनाला याच वाचकांचे बळ मिळते. त्यामुळे माझ्या कांदबरी लेखनाच्या टीकेची मी फारशी पर्वा करीत नाही अशा शब्दात त्यांनी टीकाकारांना उत्तर दिले.

यावेळी डॉ. उमा रामराव आणि सहना विजयकुमार यांनी त्यांना लाभलेला डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्याबरोबरचा सहवास आणि आठवणींना उजाळा दिला. साहित्य अकादमी समितीचे सदस्य डॉ. नरेंद्र पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्थ युवा फाउंडेशनचे संस्थापक आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी केले. संजय चाकणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी भैरप्पा यांचा परिचय करून दिला. प्रसेनजीत फडणवीस यांनी आभार मानले.

 

-----------------

 

चौकट

 

... त्यांचा मोठेपणा म्हणजे माझाच सन्मान

 

मराठी साहित्यातील ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तो कोणाकडून स्वीकारणार असे त्यांना विचारण्यात आले. त्यात मुख्यमंत्र्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांची नावे सुचविण्यात आली. पण सर्व नावे नाकारून त्यांनी भैरप्पा यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारायला आवडेल असे सांगितले. त्यांचा हा मोठेपणा म्हणजे माझाच सन्मान होता, असे मी मानतो अशी भावना डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी व्यक्त केली.

 

-------------------------

Web Title: Leaders stir up Maharashtra and Karnataka disputes for political gain: Dr. S. L. Bhairappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.