महायुतीत नेते एकत्र, पण कार्यकर्त्यांची मने जुळणार का? मावळमधील चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 01:18 PM2024-04-25T13:18:48+5:302024-04-25T13:19:59+5:30
शिंदेसेना आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट एकत्र काम करणार का? असा प्रश्न कार्यकर्तेच विचारत आहेत....
पिंपरी :मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांची मने वरकरणी जुळली असली, तरी कार्यकर्त्यांची जुळणार का? शिंदेसेना आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट एकत्र काम करणार का? असा प्रश्न कार्यकर्तेच विचारत आहेत.
वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभेच्या चिंचवड आणि कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महायुतीविरोधात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र होती. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट झाले आहेत. दोन्ही पक्षांतील एकेक गट महायुतीत गेला आहे. मावळमध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट यांच्यात तिकीट जाहीर होईपर्यंत संघर्ष सुरू होता. त्यामुळे आता नेत्यांचे जुळले, पण कार्यकर्त्यांचे जुळणार का?, असा प्रश्न आहे.
नेते काय म्हणतात?
शिंदेसेना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाल्हेकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचा विकास केला आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला उमेदवारी मिळाली आहे. आम्ही महायुतीबरोबर आहोत. मावळातील शिवसैनिक महायुतीत एकजुटीने काम करतील.
राष्ट्रवादी अजित पवार गट
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मयूर कलाटे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काम केले आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचा उमेदवार निवडून आणणे ही जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे.