भाजपाच्या हातावर मताधिक्याचा शिक्का ! भाजपाला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 06:00 AM2019-04-25T06:00:00+5:302019-04-25T06:00:05+5:30
भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि शिवसेनेचा गड असलेल्या कोथरुड मतदारसंघ ढवळून काढूनही मतदानाची टक्केवारी वाढविण्यात नेत्यांना यश मिळाले नाही...
पुणे : भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि शिवसेनेचा गड असलेल्या कोथरुड मतदारसंघ ढवळून काढूनही मतदानाची टक्केवारी वाढविण्यात नेत्यांना यश मिळाले नाही. उलट गत लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत १.८४ टक्क्यांची घट झाली असून, एकूण मतादारांच्या अवघे ५०.२६ टक्के मतदान झाले आहे. गेल्यावेळीही झालेल्या मतदानापैकी भाजपाच्या पारड्यात निम्मी मते पडली होती. त्यामुळे गत निवडणुकीप्रमाणे ४२ हजार ४०८ इतके मताधिक्य टिकविण्याचा विश्वास भाजपा नेते व्यक्त करत आहेत. कॉंग्रेस मताधिक्य गेल्यावेळ इतके होणार नसल्याचे सांगत आहे. म्हणजेच या मतदारसंघातून भाजपाला मताधिक्य मिळेल असेच कॉंग्रेस सांगताना दिसत असल्याने, येथून मताधिक्य नक्की किती हाच प्रश्न असेल.
कोथरुड मतदारसंघामध्ये २०१४ साली ३ लाख ४८ हजार ७११ मतदारांची संख्या होती. यंदा त्यात ५० हजार २५५ मतदारांची वाढ होऊन, ती ३ लाख ९८ हजार ९६६ इतकी झाली. यंदा त्या पैकी २ लाख ५२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्यावेळ पेक्षा मतदारांची संख्या १८ हजार ८१६ने वाढली असली एकूण मतदानाचा टक्का घटला आहे. भाजपाचे या विधानसभा मतदारसंघात २० पैकी १६ नगरसेवक आहेत. या मतदारसंघात भाजपाचीच निर्विवाद ताकद आहे. मतदारसंघ पुर्नरचनेत २००९ साली हा मतदारसंघ अस्तित्वात आला. शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे या मतदारसंघाचे पहिले आमदार.
हिंदुत्व, राष्ट्रीय स्वयमसेवक संघाच्या विचारांना मानणाºया वर्गाचा या मतदारसंघात प्रभाव आहे. तरीही भाजपाने या भागात जोरदार प्रचार केला. केंद्रीय नेत्यांच्या सभा, प्रचारफेरी, मतदारांच्या गाठीभेटी या माध्यमातून भाजपा-शिवसेनेने जोरदार प्रचार केला होता. त्या तुलनेत कॉंग्रेसचे अस्तित्व येथे फारसे नाही. मात्र, मोदी लाटेतही कॉंग्रेसचे २०१४मधील उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांनी ५४ हजार ९६८ मते पडली होती. खासदार अनिल शिरोळे यांच्या पारड्यात एकूण झालेल्या मतदानापैकी पन्नास टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. जवळपास २५ टक्के मते डॉ. कदम यांना होती. गेल्यावेळ पेक्षा यंदा मतांचा आकडा वाढवून या भागातील पिछाडी कमी करण्यावर कॉंग्रेसचा भरहोता.
------------------