पालेभाज्या कडाडल्या

By Admin | Published: June 3, 2017 02:35 AM2017-06-03T02:35:14+5:302017-06-03T02:35:14+5:30

शेतकऱ्यांच्या शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत अशी संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सुरू करण्यात आलेले आठवडा बाजार ओस

Leafy vegetables | पालेभाज्या कडाडल्या

पालेभाज्या कडाडल्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : शेतकऱ्यांच्या शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत अशी संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सुरू करण्यात आलेले आठवडा बाजार ओस पडले आहेत. शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी आवक कमी झाल्याने पालेभाज्यांचे भाव कडाडले. भाजी, फळे आणि दूध विक्रेत्यांनी दुप्पट, तिप्पट दर आकारून ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचवली.
पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पिंपरी पुलाखालील भाजी मंडईत नेहमी वर्दळ असते. शुक्रवारी मात्र भाजीची आवक न झाल्याने मंडईत शुकशुकाट होता. अनेक भाजी विक्रेत्यांच्या टोकऱ्या रिकाम्या दिसून आल्या. शेतकरी संपाचा परिणाम बाजारपेठेवरही जाणवला. दहा ते पंधरा रुपयांना मिळणाऱ्या मेथीच्या गड्डीसाठी ३५ ते ४० रुपये मोजावे लागले. ४० रुपये किलोने मिळणारी वांगी १०० रुपये किलोने विक्री करण्यात येत होती. कोथिंबिरीच्या गड्डीलाही २५ ते ३० रुपये द्यावे लागले. ग्राहकांना दूध मिळणे मुश्कील झाले. दूधही चढ्या भावाने विक्री होत होते. फळांची आवकसुद्धा कमी प्रमाणात झाली असल्याने वाढीव दराने फळे खरेदी करणे ग्राहकांना भाग पडले.
हॉटेल व्यावसायालाही फटका
उद्योगनगरी लगतच्या ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचा माल येत असतो. मात्र, शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे हा माल कमी झाला आहे. अजमेरा कॉलनीतील पिल्ले सांस्कृतिक भवनाजवळ दर शुक्रवारी आठवडे बाजार भरतो. या वेळी मात्र भाजी विक्रेते कोणीही फिरकले नाही. आठवडे बाजाराच्या ठिकाणी अक्षरश: मुले क्रिकेट खेळत होती. ग्राहक नेहमीप्रमाणे आठवडा बाजाराच्या ठिकाणी येत होते. मात्र, संपामुळे विक्रेत आले नाहीत, हे समजल्यानंतर त्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत होते. हॉटेलांमध्येही कांदा, काकडी, मिरची देताना आखडता हात घेतला जात होता.
आज सायंकाळी मंडईत शिल्लक भाजीपाल्याचे दर वाढले आहेत़ जास्त भाव देऊन शिळ्या भाज्या विकत घेण्यापेक्षा कडधान्य शिजवून भाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापुढेही आंदोलन सुरू राहिले तर काय भाजी करावी हा प्रश्न सतावत आहे, असे रुपीनगर येथील गृहिणी कविता पडवळ यांनी सांगितले.

चिखली मंडईतून पालेभाज्या गायब

चिखली : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम भाजी मंडईत दिसून येत आहेत. कालपासून शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये शेतीमाल विक्री करणे बंद केले आहे. त्यामुळे आज चिखली परिसरात एकाही विक्रेत्याकडे मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर यांसारख्या लोकांच्या दैनंदिन आहारात असणाऱ्या पालेभाज्या विक्रीसाठी उपलब्ध नाहीत.
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला शहरातील काही विक्रेते पाठिंबा देत असून तेही भाजी खरेदी करण्यासाठी मार्केट अथवा प्रत्येक्ष शेतकऱ्याकडे गेलेले नाहीत, विक्रेते उपलब्ध असलेल्या कालच्या आणि परवाच्या शिल्लक मालाची विक्री करत आहेत. त्यातच शेतमालाची आवाक घटल्याने मालाचे भाव वाढवले आहेत. २० रुपये किलो असलेले टोमॅटो ४० रुपये, १० रु. पावशेर असलेली गवार १५ रु. झाली असून १५ रुपये प्रतिकिलो विकले जाणारे बटाटे २० रु़ भावाने विकले जात आहेत.

Web Title: Leafy vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.