गळतीवरून मुख्य सभेत होणार गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 03:24 AM2018-06-28T03:24:39+5:302018-06-28T03:24:41+5:30
महापालिकेच्या वतीने तब्बल ४९ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या नवीन विस्तारीत प्रशासकीय इमारतीच्या सभागृहाला उद्घाटनच्या दिवशीच गळती लागली.
पुणे : महापालिकेच्या वतीने तब्बल ४९ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या नवीन विस्तारीत प्रशासकीय इमारतीच्या सभागृहाला उद्घाटनच्या दिवशीच गळती लागली. तसेच उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे ढिसाळ नियोजन यावरून विरोधकांकडून गुरुवारी (दि.२८) होणाऱ्या मुख्य सभेत सत्ताधारी भाजपाला चांगलेच धारेवर धरण्यात येणार आहे. या शिवाय खाससी कंपन्यांच्या प्रस्तावावर वेळेत अभिप्राय न दिल्याने पीएमपीच्या कोणत्याही प्रस्तावावर निर्णय घेऊ नका, असे भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या लेखी पत्रावरूनदेखील विरोधक भाजपाची कोंडी करण्याची शक्यता आहे. यामुळे गुरुवारी होणारी सर्वसाधारण सभा चांगली गाजण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीचे काम पूर्ण झाले नसताना सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाºयांनी अति घाईगडबड करून उद्घाटनाचा घाट घातला. यासाठी देशाचे उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. परंतु भाजपाच्या गचाळ कारभारामुळे उद्घाटनाच्या कार्यक्रमातच सभागृहाला गळती लागली अन् महापालिकेची नाच्चकी झाली.
तसेच अत्यंत थाटात उद्घाटन करताना योग्य नियोजन न केल्याने अनेक नगरसेवकांना व शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तींना उपस्थित राहता आले नाही. यामुळेही अनेक सदस्य नाराज झाले असून, या भोंगळ कारभारावरून भाजपाला धारेवर धरण्यात येणार आहे.
दरम्यान भाजपाचे शहराध्यक्ष यांनी महापौर मुक्ता टिळक यांना लेखी पत्र देऊन एखाद्या प्रस्तावावर निर्णय घेऊ नका, असे सांगणेच
अत्यंत चुकीचे असून, पक्षाच्या
वतीने थेट महापालिकेच्या
कारभारात ढवळाढवळ सुरू केली आहे.
याचादेखील जोरदार निषेध करून गोगावले यांच्या ‘एजंटगिरीवर खडाजंगी होण्याची शक्यता आहे. याशिवाय प्लॅस्टिकबंदीनंतर प्रशासनाकडून सुरू असलेल्या चुकीच्या कारवाईबाबतदेखील विरोधक सत्ताधाºयांना लक्ष्य करणार आहेत. यामुळे गुरुवारी होणारी मुख्यसभा चांगलीच गाजण्याची शक्यता आहे.