अथर्वशीर्ष शिका आणि उच्चार सुधारा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:14 AM2021-09-10T04:14:25+5:302021-09-10T04:14:25+5:30

घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी बाप्पांचे आगमन झाले की बहुतेक ठिकाणी आपल्याला अथर्वशीर्षाचे पठण केल्याचे समजते. अथर्वशीर्षाचे पठण हे एकदा, अकरा ...

Learn Atharvashirsha and improve pronunciation. | अथर्वशीर्ष शिका आणि उच्चार सुधारा..

अथर्वशीर्ष शिका आणि उच्चार सुधारा..

googlenewsNext

घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी बाप्पांचे आगमन झाले की बहुतेक ठिकाणी आपल्याला अथर्वशीर्षाचे पठण केल्याचे समजते. अथर्वशीर्षाचे पठण हे एकदा, अकरा वेळा किंवा एकवीस वेळा केला जातो. आपणही आपल्या घरात आरती झाली की अथर्वशीर्षाचे पठण करतो. जरी अथर्वशीर्ष म्हणता येत नसले तरी आता वेगवेगळ्या माध्यमातून ऐकण्यास मिळते. आताच्या या युगात युट्युबसारखे चॅनेल आपल्या मदतीला येतात. बऱ्याचदा आरती देखील या युट्युबच्या माध्यमातून लावली जाते. या चॅनेलद्वारे आपण आपल्या मुलांना रोज अथर्वशीर्ष आणि मंत्रपुष्पांजली याचे पठण ऐकवू शकतो. त्यामुळे रोज कानी पडणारे कठीण शब्दही सहज सोपे वाटतील. गणपतीच्या या काळात रोज सकाळ-संध्याकाळ आरती झाल्यावर अथर्वशीर्षाचे पठण ऐकवले तर मुलांचे पाठांतरही लवकर होईल. रोजचे तेच शब्द त्याच ओळी सतत ऐकल्याने त्यांचे पाठांतर होईलच शिवाय त्याचा अर्थही त्यांना समजून घेणे सहज शक्य होईल. गणपती बाप्पा आले की मुलांमध्ये वेगळाच उत्साह असतो. त्यामुळे अथर्वशीर्ष आपल्या दृष्टीने कठीण असले तरी या लहान मुलांना रोजच्या ऐकण्याने सहज शक्य होते. मोठ्यांना जमतं आणि आपल्याला का नाही, असे म्हणत बच्चे कंपनी आरती, अथर्वशीर्ष यांच्या पाठांतरावर विशेष जोर देतात अशाने ज्यावेळी बाप्पापुढे म्हणण्याची वेळ येते त्यावेळी त्यांनी केलेला प्रयत्न हा दिसून येतो. स्पष्ट नसले तरी अडखळत का होईना पण मोठ्यांच्या बरोबरीने ही मुले हातात टाळ, घंटी घेऊन उभे राहतात. लहान मुलांमध्ये गणपती बाप्पा विषयी खूप वेगळी भावना आहे.

सजावटीपासून ते प्रसाद वाटण्यापर्यंतची सर्व कामे करण्यात या मुलांचा उत्साह खूप दांडगा असतो. त्यामुळे त्यांच्या कल्पनाही काही वेगळ्या असतात. डेकोरेशनच्या बाबतीतही बच्चे कंपनी मोठ्याप्रमाणे तयारी करण्याचा उत्साह दाखवत असतात. मोठ्यांचा ओरडा खात आपला हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतात. आपणही काही तरी वेगळे करू शकतो हा त्यांचा अट्टहास यावेळी दिसून येतो. ११ दिवस आपल्या घरी आलेल्या बाप्पासाठी आपण अजून काय करू शकतो याचे भन्नाट प्लॅनिंग ही मुले करत असतात. बाप्पा घरी आले की नवनवीन कपडे घालून बाप्पा विराजमान झालेल्या ठिकाणी बसून राहणे. स्वतःहून बाप्पासाठी आपण केलेली तयारी उत्साहाने घरी आलेल्या नातेवाईकांना दाखविणे, त्यांच्याकडून शाबासकीची दाद मिळविणे, वेगवेगळ्या पद्धतीने बाप्पासाठी केलेले मोदक मनमुराद खाणे, हे सर्व करण्यात त्यांना वेगळाच आनदंत मिळत असतो. हे सर्व करत असताना ज्यावेळी मला अथर्वशीर्ष आणि मंत्रपुष्पांजली म्हणता येते असे जेव्हा ही मुले इतरांना सांगत असतात त्यावेळी त्यांना होणारा आनंद हा काही औरच असतो. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाल्यानंतर आतुरता असते ती गौरीच्या आगमनाची. घरातील सर्वच स्त्रिया गौरीचे व्रत आणि पुजा खूप भक्तिभावाने करतात. गौराईला ज्या पद्धतीने सजवले जाते तसे काहीसे आपल्या आईने आपल्याला सजवावे असा विनोदी अट्टहास हा लहान मुलींचा दिसून येतो.

आज कोरोनासारख्या आजाराने सध्याची परिस्थिती खूप बदललेली आहे. कोरोनाचे सावट असल्यामुळे यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत आरती, भजन, लहान मोठ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा यासारख्या कार्यक्रमांची रेलचेल सुरू होते. ज्याप्रमाणे वाजत गाजत थाटामाटात बाप्पांना आपण घरी आणतो त्याप्रमाणे अकराव्या दिवशी गणपतीचे विसर्जनही मोठ्या जल्लोषाने केले जाते. “गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या" असे म्हणत लहान मुले डोळ्यांत अश्रू आणत बाप्पांना निरोप देतात. आपल्या बाप्पासाठी बच्चे कंपनी उत्साहाने सर्वकाही करणार यात तिळमात्रही शंका नाही.

--

साक्षी कळवणकर

Web Title: Learn Atharvashirsha and improve pronunciation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.