राजकीय नेत्यांनो कोरोना काळात आंदोलन कसं करायचं ते या कचरावेचकांकडून शिका !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 12:47 PM2021-06-28T12:47:19+5:302021-06-28T12:48:25+5:30
कोरोना काळात आंदोलन कसे करावे याचा आदर्श पुण्यातील कचरावेचकांनी घालून दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या राजकीय आंदोलनाचा पार्श्वभूमीवर ...
कोरोना काळात आंदोलन कसे करावे याचा आदर्श पुण्यातील कचरावेचकांनी घालून दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या राजकीय आंदोलनाचा पार्श्वभूमीवर कोरोना साठीचे सर्व नियम पाळून झालेले हे आंदोलन वेगळे ठरले आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कचरावेचकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे कचरावेचक कोरोना काळात केलेल्या कामाचा भत्ता मिळावा, तसेच विमा कवच दिले जावे या मागणीसाठी पुण्यातील सर्व कचरावेचक रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच गेले काही महिने सातत्याने स्वच्छ संस्थेला तात्पुरती मुदतवाढ दिली जात आहे. त्यामुळे या कचरावेचकांच्या रोजगाराचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. एका खाजगी कंत्राटदारासाठी हा सर्व अटापिटा केल्या जात असल्याचा आरोप होतो आहे.
त्यामुळे कचरावेचक आज रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यात आज महापालिकेसमोर कचरावेचक आंदोलन करत आहेत. कोरोना काळात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या राजकीय आंदोलनात सर्व नियम पायदळी तुडवले पाहायला मिळाले होते. पण कचरावेचकानी मात्र या सगळ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. आंदोलनाला नियमा प्रमाणे फक्त ५० कचरा वेचक उपस्थित राहिले आहेत. इतकंच नाही तर गर्दी न करता व्यवस्थित जागा ठेवून एका रांगेत बसून हे आंदोलक शांतपणे आपली भूमिका मांडत आहेत. घोषणा देताना देखील कोणीही आपला मास्क काढलेला पाहायला मिळाला नाही.
या आंदोलनाला बाबा आढाव यांचा बरोबरीने सुप्रिया सुळे, मोहन जोशी इतकंच नाही तर भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर हे देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या "कचरा डेपो बघून आले. तक्रारी वाढल्या आहेत.कचरा डेपो चालत नाही त्याला पाच वर्षात 1 हजार कोटी देता, स्वच्छ च्या भगिनींना वेगळा करून दिलेला कचरा तिथे एकत्र केला जातो. हेच पैसे त्यांना दिले तर शिक्षण आरोग्य मिळेल. कोविड डेंग्यू रोगराई पसरते आहे. मी पण स्वच्छला पैसे देते. बाबांना आंदोलनात उतरावे लागणे हे दुर्दैव. मुख्यमंत्री पालकमंत्री यांना विनंती करून स्वच्छला काम देण्याबाबत चर्चा करणार. भगिनींना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. लोकांची बांधीलकी जपली पाहिजे. बाबा म्हणतील तेच होईल.पालिका आयुक्त महापौरांशी याबाबत बोलणार आहे.
डॉ. बाबा आढावा म्हणाले," कंत्राटदार आणायचे नाटक कशासाठी, आम्ही काय पाप केलेय? आम्ही नगरसेवकांना भेटलोय, पक्ष नेत्यांना भेटलो, पाठिंबा दिला पण घडत काही नाही. आम्ही दुहेरी संकटात आहे. पालिकेने आणि आम्ही चर्चा करून स्वच्छ नावाचा पर्याय काढला. स्वच्छ संस्था नियंत्रण करते. पालिका पगार देत नाही. आम्हाला नोकर मानत नाही. 50 कोटी लोकांना संरक्षण नाही कामगार म्हणून मान्यता नाही. सामाजिक सुरक्षा कायद्याखाली नोंदणी करीत नाही. आम्ही मेलो तर कोणाला सुतक पडतंय. विमा मागून मिळत नाही. यांच्या थोबाडीत मारायला हवी. स्वच्छचा पर्याय टिकलाच पाहिजे. वडीलकीच्या नात्याने आलो. कचरा वेचक महिला या माझ्या मुली. कोरोनाच्या मारले, पालिकेने नागवले,तक्रारही करूनही दाद मिळत नाही.कोरोना काळात नागरिकांकडून 25 कोटी दण्ड वसूल केला. हातावरच्या पोट असलेल्यांना दंड केला. आम्हाला काय दिलंत? कोरोनाचा फायदा सत्ताधारी आणि प्रशासन घेत आहे.. आम्ही घाण उचलून आम्हाला काय मिळालं? महापौर आयुक्तांनी घाणीत काम करणार्यांना काय हे दिलं स्पष्ट करावं. २०० टन कचरा प्रक्रिया उद्योगाला जातोय. डेपो बंद झाले. भ्रष्टाचार होतोय. स्वतःचे हाल करून आम्ही काम करतोय. शाहू फुले आंबेडकर शिवाजीचे नाव घेवून चालणार नाही. कष्टकऱ्यांचा बाजूने उभे रहा.हे खाजगी कंत्राट आणले तर या वयात सांगतोय... मी गप्प बसणार नाही. कामगारांना संरक्षण द्या. विमा मिळावा, भत्ता मिळावा, आश्वासने पाळा, आर्थिक धोरणांचा विचार करा. विषमता वाढली."
यावेळी बोलताना गणेश बिडकर म्हणाले" आम्ही स्वच्छ कडून काम लढण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. स्वच्छ चे काम सुरू राहणार आहे"