NSD मध्ये रोजची सायंकाळ फालतूपणात न घालवता ३ वर्षे हावरटासारखे शिकलो - ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे
By श्रीकिशन काळे | Published: November 26, 2023 12:53 PM2023-11-26T12:53:39+5:302023-11-26T12:54:02+5:30
प्रत्येक कामात मन लावा, त्यात आवड निर्माण होईल आणि तुम्ही ते काम उत्तम कराल
पुणे: मी आज जो आहे, त्याचा पाया एनएसडी मध्ये झाला. मी तीन वर्षं तिथे होतो. रोज तिथली सायंकाळी फालतूपणात घालवली नाही. मी फक्त हावरटासारखा शिकलो. ते हावरटपणाच मला खूप काही शिकवून गेला आणि तेव्हाच माणूस देखील मोठा होत असतो, अशा भावना ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांधी व्यक्त केले. डेक्कन लिटरेचर फेस्टिवलमध्ये रविवारी सकाळी केंद्रे यांची मुलाखत झाली. त्यावेळी ते बोलत होते.
ग्रामीण भागातून दिल्लीत एनएसडी मध्ये गेल्यावर काय वाटलं याविषयी वामन केंद्रे म्हणाले, फाइव्ह स्टार मध्ये गरीब गेल्यावर कसं वाटतं अगदी तसंच मी दिल्लीत नॅशनल ड्रामा स्कूल मध्ये गेलो तेव्हा वाटलं. मी एनएसडी मधील वाईट बोलत नाही पण तिथले वातावरण सांगतोय. तिथे पोचलो आणि काही मुली शाॅर्टस घालून हातात सिगारेट घेऊ़न फिरत होत्या. हे तिथलं वातावरण आहे. या ठिकाणी मन मोकळं करायला हवं शरीर दाखविण्याची ती जागा नाही. तिथला माहोल खूप आवश्यक आहे. तिथे कोणती बंधने नसली पाहिजेत. तेव्हाच तिथला विद्यार्थी चांगला शिकू शकतो.
पाचवीत असताना मी पहिल्यांदा नाटकात काम केले आणि मुलीचे काम केले. त्या नाटकात एकच डायलॉग होता. नंतर डान्स करण्याचा प्रसंग होता. तेव्हा मला नाटक समजलं आणि याकडे वळलो. भाषण करायची मला खूप आवड आहे. बीडमध्ये एकदा महाविद्यालयात निरोप समारंभ होता. तेव्हा मी भाषण झाडलं. नागनाथ कोत्तापल्ले हे प्रमुख होते. त्यांना खूप आवडलं. त्यांनी मला दोन रूपये बक्षीस दिले आणि ते दोन रूपये आजदेखील माझ्याकडे आहेत. हे दोन रूपये माझी प्रेरणा बनली.
मराठी माणसांना मराठी बोलण्याचं वावडं आहे. अनेकजण घरी इंग्रजी वृत्तपत्र वाचतात. या लोकांना काही सांगण्यासाठी मी इंग्रजीमध्ये नाटक केले. तमाशा इंग्रजीत केले आणि त्याला खूप गर्दी झाली. इंग्रजी भाषीकांत मी पोचलो. सर्वांपर्यंत जाण्यासाठी इंग्रजी माध्यम केले. चांगला कंटेंट मिळविण्यासाठी तीन वर्षं काम केले. नटरंग कादंबरी माझ्यासमोर आली आणि त्यावर काम सुरू केले. उत्तम तुपे यांच्या कादंबरीवर एक नाटक केले. जोगते जोगतीण या विषयावर तेव्हा २२ दिवसांत नाटक केले.मनोरंजन म्हणजे केवळ हसवणे नाही. नवरसातील सर्व रस रसिकांसमोर आणणे ते नाटक आहे. नाटक पाहिल्यावर आयुष्यभर तुमच्या मनात राहते. ते खरे नाटक, चित्रपट.
चंद्रासारखी भाकरी येते...
मला स्वयंपाक करायला आवडतो. मी भाकरी चंद्रासारख्या गोल करतो. प्रत्येक कामात मन लावा. त्यात आवड निर्माण होईल आणि तुम्ही ते काम उत्तम कराल.