बारामती तालुक्यात शिकाऊ विमान कोसळले, तांत्रिक बिघाड झाल्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 05:04 PM2023-10-19T17:04:21+5:302023-10-19T17:06:16+5:30
काही वेळानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळले, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे....
बारामती :बारामतीत विमान प्रशिक्षण संस्थेचे शिकाऊ विमान कोसळले आहे. ही घटना तालुक्यातील कटफळ रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर घडली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या विमानाने बारामतीतील विमानतळावरून टेकऑफ घेतले होते. काही वेळानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळले, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
बारामतीतील विमान चालविण्याचे प्रशिक्षण देणारी रेडबर्ड नावाची संस्था आहे. आज सायंकाळी शिकाऊ विमान लँडिंग करताना कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पायलट शक्ती सिंग हे या अपघातात किरकोळ जखमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून बारामतीत विमान प्रशिक्षण संस्था त्यांचे प्रशिक्षण कार्यालय चालवत आहेत. यासाठी बारामतीतील विमानतळाचा वापर होतो. काही महिन्यांपूर्वीच इंदापूर तालुक्यातील एक शिकाऊ विमान कोसळले होते. यावेळी विमानाचे नुकसान झाले होते. ती घटना ताजी असतानाच आता दुसऱ्या एका प्रशिक्षण संस्थेचे विमान कोसळले आहे.