विज्ञानाचे कुतूहल निर्माण करण्यात शिक्षण अपयशी
By admin | Published: June 30, 2017 03:54 AM2017-06-30T03:54:12+5:302017-06-30T03:54:12+5:30
‘शालेय अभ्यासक्रमातील विज्ञानाची पुस्तके वाचली की भीती वाटते. इंग्रजी पुस्तकांचा शब्दश: अनुवाद करण्याच्या हव्यासामुळे विज्ञानाची पुस्तके क्लिष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘शालेय अभ्यासक्रमातील विज्ञानाची पुस्तके वाचली की भीती वाटते. इंग्रजी पुस्तकांचा शब्दश: अनुवाद करण्याच्या हव्यासामुळे विज्ञानाची पुस्तके क्लिष्ट आणि रंजकतेच्या अभावामुळे रुक्ष झाली आहेत. वैज्ञानिकांची चरित्रे रंजक पद्धतीने सांगितली जात नाहीत. मूळात शिक्षकांनाच विज्ञानाचे मूलभूत ज्ञान नसल्याने विज्ञानाविषयीचे कुतूहल मुलांमध्ये निर्माण करण्यात शिक्षण व्यवस्था अपयशी ठरते आहे, अशी खंत विज्ञानविषयक लेखन करणारे प्रसिद्ध लेखक निरंजन घाटे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात अर्चना जगदीश यांनी घाटे यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मसापचे कार्यध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. घाटे यांच्या मुलाखतीतून त्यांचा अफाट ग्रंथसंग्रह, तो जमवताना आलेले अनुभव, लेखनाचा विलक्षण झपाटा, त्यातून साकारलेली १८५ पुस्तके, वाचकांचे अनुभव हा सारा प्रवास मुलाखतीतून उलगडला.
घाटे म्हणाले, ‘बाबूराव अर्नाळकर यांच्या रहस्यकथांचा मी चाहता होतो. त्यांच्यासारखे साधे, सोपे आणि वाचकांना गुंतवून ठेवणारे लिहिता आले पाहिजे, असे वाटायचे. कोयनेचा भूकंप झाल्यानंतर एका दैनिकाकडून लेखाची मागणी झाली. तो लिहिण्यासाठी कोयनेला गेलो. वाचनातून खूप विषय मिळत गेले. वृत्तपत्रातील स्तंभ लेखनामुळे मोठा वाचक वर्ग मिळाला.
आधुनिक युगात विज्ञानाने गुंतागुंतीचे अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. त्यांना विज्ञान कथाकारांनी भिडले पाहिजे.’ मी बालभारतीच्या समितीवर असताना अनेक सूचना केल्या. त्या न पचनी पडल्यामुळे मलाच वगळण्यात आले, अशी टिपण्णीही त्यांनी केली. उद्धव कानडे यांनी आभार मानले. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.