लर्निंग लायसन्स ऑफलाइनच बरे; आरटीओ कार्यालयात पुन्हा गर्दी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:05+5:302021-07-02T04:09:05+5:30
परीक्षार्थींना प्रश्नच नीट समजत नसल्याने नापास होण्याचे प्रमाण अधिक, त्यामुळे गाठताहेत आरटीओ कार्यालय लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या ...
परीक्षार्थींना प्रश्नच नीट समजत नसल्याने नापास होण्याचे प्रमाण अधिक, त्यामुळे गाठताहेत आरटीओ कार्यालय
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने ऑनलाईन लर्निंग लायसन्स काढण्याची सुविधा दिली .मात्र यात अडचणी येत असल्याने अनेक जण प्रत्यक्ष आरटीओ कार्यालय गाठून लायसन्स काढत आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालयात पुन्हा गर्दी वाढत आहे.
परिवहन विभागाने १४ जूनपासून सर्वच प्रकारच्या लर्निंग लायसन्स काढण्यासाठी ऑनलाईन सोय केली. त्यामुळे घरी राहूनच
लायसन्स काढणे सोपे झाले. मात्र एक ते दोन दिवसांतच यावर अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे अनेक वाहनधारकानी ऑनलाईनचा नाद सोडून पुन्हा ऑफिस मध्ये येऊनच लायसन्स काढणे पसंत केले. मात्र यामुळे परिवहन विभागाचा मूळ हेतूलाच धक्का बसत आहे.
---------------------
ऑनलाईनसाठी अडचणी काय :
1. मोबाईल वरून ऑनलाईन परीक्षा देताना अनेकदा सर्व्हरची समस्या निर्माण होते.
2. अनेक परीक्षार्थींना प्रश्नच नीट समजत नाही. त्यामुळे परीक्षेत नापास होण्याचे प्रमाण वाढले आहे.
3.नापास झाल्या नंतर पुन्हा परीक्षा देण्यासाठी साइट लवकर ओपन होत नाही.
-------------------
उमेदवार वेगळा, ऑनलाईन परीक्षा देणारा दुसराच :
अनेक परीक्षार्थींना परीक्षेत विचारणारे प्रश्नच नीट समजत नाही. शिवाय प्रत्येक प्रश्नाला केवळ ३० सेकंदाची मर्यादा आहे. ३० सेकंदात उत्तर नाही दिले तर लगेच पुढचा प्रश्न येतो. गडबडीत उत्तर चुकून नापास होण्याचे प्रमाण अधिक आहे. नापास झालो तर पुन्हा ५० रुपये फी भरून पुन्हा ही सर्व प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे हे टाळण्यासाठी परीक्षार्थीं ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी डमी उमेदवार उभा करतात.
------------------------
म्हणून आरटीओ कार्यालय गाठले :
माझ्या आधार कार्ड संदर्भात थोडी अडचण होती. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा देता येत नव्हती. त्यामुळे मी आरटीओ कार्यालयात आलो.
प्रणव बद्रे ,परीक्षार्थीं, पुणे.
--------------------
ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत. वाहनधारकांनी त्याना जी सुविधा हवी आहे ती निवडण्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे. मात्र ऑनलाईन मध्ये कोणतीही समस्या नाही.
-डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.
--------------------------
१४ जूनपासून राज्यात ऑनलाईन पद्धतीने लायसन्स देण्याची सोय झाली. आतापर्यंत पुणे आरटीओ कार्यालयात येऊन जवळपास ४५०० ते ५००० जणांनी आपले लायसन्स काढले आहे. म्हणजे रोज जवळपास २५० जण केवळ लर्निंग लायसेन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात आले आहेत.