मालकीची यंत्रे असतानाही भाडेतत्वावर घेण्याचा जलसंपदा विभागाचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 06:45 PM2018-07-23T18:45:17+5:302018-07-23T19:04:42+5:30
कालव्यांमधील गाळ काढण्याचे काम जलसंपदाकडून सातत्याने केले जाते. त्यासाठी डंपर्स व अन्य यंत्र लागतात. अशी यंत्र जलसंपदाच्याच अन्य विभागांमध्ये वापराविना पडून आहेत....
पुणे: खात्याच्याच अन्य विभागांमध्ये यंत्रसामग्री असताना ती मागवण्याऐवजी भाडेतत्त्वावर नवी सामग्री घेण्यासाठी तब्बल ४२ लाख रूपयांची निविदा जाहीर करण्याचा प्रताप जलसंपदाने केला आहे. कालव्यांमधील गाळ काढण्याच्या कामात ठेकेदाराचे भले करण्यासाठी म्हणून हा खर्च करण्यात येत असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केला आहे.
कालव्यांमधील गाळ काढण्याचे काम जलसंपदाकडून सातत्याने केले जाते. त्यासाठी डंपर्स व अन्य यंत्र लागतात. अशी यंत्र जलसंपदाच्याच अन्य विभागांमध्ये वापराविना पडून आहेत. ती मागवली तर गाळ काढण्याचे काम करणे सहज शक्य आहे. मात्र तसे न करता सांगोला तसेच नीरा उजव्या कालव्यामधील गाळ काढण्यासाठी म्हणून जलसंपदाने दोन निविदा प्रसिद्ध केल्या आहेत असे मंचाचे पदाधिकारी विवेक वेलणकर व विश्वास सहस्त्रुबद्धे यांनी सांगितले.
सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर तसेच उर्वरित महाराष्ट्रातील जलसंपदा कार्यालयांमध्ये खात्याच्याच मालकाची अशी यंत्र आहेत. गाळ काढण्याच्याच कामासाठी म्हणून ही यंत्र वापरण्यात येतात. सध्या काम नसल्याने ही यंत्र विनावापर पडून आहेत. त्यांचा वापर या कामासाठी करावा, संबधित निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी मंचाने जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.