दोन महिन्यांत किमान ६० टक्के लसीकरण व्हायला हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:09 AM2021-06-01T04:09:32+5:302021-06-01T04:09:32+5:30
तज्ज्ञांचे मत : पहिल्या लाटेप्रमाणे गाफील राहून चालणार नाही प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : . पहिल्या लाटेनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या ...
तज्ज्ञांचे मत : पहिल्या लाटेप्रमाणे गाफील राहून चालणार नाही
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : . पहिल्या लाटेनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या निष्काळजीपणाची पुनरावृत्ती दुसऱ्या लाटेनंतर येऊ नये, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. पुढील दोन महिन्यांत किमान ६० टक्के लसीकरण पूर्ण करावे लागेल. १४ ते ४५ या वयोगटालाही तिसऱ्या लाटेचा धोका आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. नुकताच विषाणूचा व्हिएतनाम व्हेरिएंट सापडला आहे. हा ब्रिटिश आणि भारतीय विषाणूचा हायब्रीड असल्याचे बोलले जात असून तो जास्त संसर्गजन्य आहे. त्यामुळे इतर देशांमध्ये लसींचे तीन डोस देण्याचे नियोजन सुरू आहे. अशा अनपेक्षित संकटाला तोंड देण्याच्या दृष्टीने आपली आरोग्य यंत्रणा सतर्क असायला हवी, असाही मतप्रवाह पुढे येत आहे.
तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. मात्र, कोरोना विषाणूने आतापर्यंतचे सर्व अंदाज खोटे ठरवले आहेत. डिसेंबर-जानेवारी महिन्यात कोरोना गेला, असे वाटले होते. प्रत्यक्षात विषाणू सुप्तावस्थेत गेला होता. त्यानंतर झालेले म्युटेशन आणि निर्माण झालेल्या व्हेरिएंटमुळे संसर्गाचा धोका आणि वेग अनेक पटींनी वाढला. त्यामुळे अधिक सतर्क राहणे आणि लसीकरणाचा वेग वाढवणे, यावर भर असला पाहिजे.
-----
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या खाली गेल्यावरच लाट ओसरली, असे म्हणता येते. आपल्याकडे पॉझिटिव्हिटी रेट अद्याप दहाच्या खाली गेलेला नाही. रुग्णसंख्या कमी झाली, तरी प्रति मिलियन ५०० चाचण्या होणे अपेक्षित असते. त्याच वेळी पॉझिटिव्हिटी रेटकडे लक्ष ठेवायचे असते. रुग्णसंख्या काहीशी कमी झाली असली तरी सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री विसरता येणार नाही. ९० टक्के जनतेचे लसीकरण होईपर्यंत निर्बंध सुरू ठेवणे गरजेचे आहे.
साठ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण बऱ्यापैकी पूर्ण होत आले आहे. ४५ ते ६० वर्षे वयातील काही नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र, १८ ते४५ या वयोगटांतील अत्यंत कमी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे तिसऱ्र्या लाटेत लहान मुलांना धोका आहे, असे म्हटले जात असले तरी नेमका अंदाज कोणीच बांधू शकत नाही. लहान मुलांएवढा तरुणांनाही धोका असणार आहे. त्यामुळे दुसरी लाट कमी झाली, तरी कोणीही गाफील राहून किंवा निष्काळजीपणा करून चालणार नाही.
- डॉ. दिलीप कदम, अध्यक्ष, पुणे टास्क फोर्स
------
एक-दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर विषाणू पुन्हा सक्रिय झाला आणि अधिक गंभीर, वेगवान अशा दुसऱ्या लाटेला आपल्याला सामोरे जावे लागले. पहिली लाट आली तेव्हा संसर्ग वाढू नये म्हणून काय करायचे, याचे उत्तर आपल्याकडे नव्हते. मात्र, आता लसीकरणाच्या रुपात आपल्याला उत्तर सापडले आहे. सध्या महाराष्ट्रात दररोज १८,००० ते २०,००० रुग्णसंख्या दिसत आहे. त्याचवेळी एका दिवशी पाच ते सहा लाख नागरिकांचे लसीकरण होत आहे. काही दिवसांमध्ये दररोजची रुग्णसंख्या पाच हजारांपर्यंत कमी होईल. त्याचवेळी दररोज १५ ते २० लाख नागरिकांचे लसीकरण झाले पाहिजे. किमान ६० टक्के लोकांचे पुढील दोन महिन्यांमध्ये लसीकरण झाल्यास तिसरी लाट कदाचित रोखता येऊ शकेल. लसीकरणाचा रोड मॅप तयार करावा लागेल. देशात आतापर्यंत फक्त दहा टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे. ० ते १८ वयोगटातील ३० टक्के लोकसंख्या बाजूला ठेवली, तरी १०० कोटी लोकांचे लसीकरण करण्यासाठी २०० कोटी डोस आपल्याला उपलब्ध होणार आहेत का आणि ते किती वेळात उपलब्ध होणार आहेत, याचे नियोजन करावे लागणार आहे.
- डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, इंग्लड
------
लसींची उपलब्धता
लसी लवकर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी लस उत्पादक कंपन्यांवरही दबाव आणून चालणार नाही. कारण, युरोपमध्ये काही लसींच्या बॅचच्या बॅच सदोष निघाल्यामुळे तरुणांमध्ये रक्त गोठण्याची उदाहरणे समोर आली. लसींचे उपलब्ध होणारे डोस, लोकसंख्या आणि लसीकरणाचा वेग या सर्व निकषांचा शासनाने बारकाईने विचार करून मगच नियोजन करायला हवे.