सैनिकांच्या गोलेगावात लोकवर्गणीतून शहीद स्मारक! घरातील किमान एक व्यक्ती सैन्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 12:47 AM2018-08-15T00:47:32+5:302018-08-15T00:47:47+5:30
ज्या गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती सैन्यात आहे, त्या गोलेगावात लोकवर्गणी तसेच देणग्यांतून शहीद स्मारक उभे राहात आहे. या स्मारकाचे ९० टक्के काम पूर्णत्वास आले आहे.
शिरूर - ज्या गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती सैन्यात आहे, त्या गोलेगावात लोकवर्गणी तसेच देणग्यांतून शहीद स्मारक उभे राहात आहे. या स्मारकाचे ९० टक्के काम पूर्णत्वास आले आहे. सैन्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावाच्या स्मारकासाठी शासकीय निधी मिळाला असताना हे स्मारक केव्हाच उभे राहिले असते, हे मात्र खरे.
दुसºया महायुद्धापासून ते कारगगिलच्या युद्धापर्यंत गोलेगावातील अनेक जवान देशासाठी शहीद झाले. गावातील प्रत्येक घरातील किमान एक तरी व्यक्ती सैन्यात असण्याची फार जुनी परंपरा या गोलेगावात आहे. आजमितीला या गावातील ८० तरुण सैन्यात आहेत, तर ९५ माजी सैनिक हयात आहेत.
मनामनांत देशभक्ती सजल्याचे हे द्योतक म्हणावे लागेल.
देशाप्रति एक अनोख्या प्रकारे प्रेमभावना जपणाºया गोलेगावात शासनाने केव्हाच शहीद स्मारक उभारणे व त्यासाठी निधी उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र २०१८ साल उजाडले तरी शासनाने या गावाकडे पाहिजे तेवढ्या गांभीर्याने लक्ष दिले नाही. या स्मारकासाठी अखेर गावकरीच पुढे आले. ग्रामपंचायतीने ठराव करून कृष्णामाई मंडळाला स्मारकासाठी जागा दिली. स्मारकासाठी ‘शहीद जवान स्मारक समिती’ची स्थापना करण्यात आली. लोकवर्गणी तसेच देणग्यांतून स्मारकाच्या उभारणीस सुरुवात करण्यात आली. या स्मारकाचे ९० टक्के काम पूर्णत्वास आले आहे. अद्यापही थोडे काम बाकी आहे. मात्र ज्या गावातील नऊ जवान शहीद झाले, त्या गावात शहिदांचे स्मारक उभे राहण्यास एवढा कालावधी लागायला नको होता, अशीच गावकºयांची भावना असेल. स्मारक उभे राहिले याचे गावातील आजी- माजी सैनिकांना समाधान असावे.
दुसºया महायुद्धात गोलेगावातील भागुजी बाळाजी वाखारे, श्रीपती विनोबा भोगावडे, बापू शंकर वाखारे, किसन शंकर वाखारे, बापू मारुती भोगावडे, चिमाजी गणपत इसवे हे जवान शहीद झाले.
जयराम नारायण महाजन (१९६२ चे युद्ध), सोपान बळवंत वाखारे (१९७१ चे युद्ध),बाळासाहेब धोंडिबा गायकवाड (२००० चे कारगिल युद्ध) हे जवानही शहीद झाले आहेत.