कॉल ड्रॉप पाठ सोडेना, रेंज काही मिळेना; मोबाईल कंपन्या हतबल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 03:08 AM2018-11-02T03:08:24+5:302018-11-02T06:48:56+5:30

शहरातील विविध भागांत ‘आउट आॅफ कव्हरेज’

Leave the call drop text, get some of the range | कॉल ड्रॉप पाठ सोडेना, रेंज काही मिळेना; मोबाईल कंपन्या हतबल

कॉल ड्रॉप पाठ सोडेना, रेंज काही मिळेना; मोबाईल कंपन्या हतबल

Next

पुणे : आकर्षक सवलती, बहुरंगी, बहुपयोगी अशा सुविधा असलेले मोबाईल विविध कंपन्यांच्या माध्यमातून बाजारपेठेत दाखल होतात. ग्राहक मोठ्या प्रमाणावर सणवाराच्या निमित्ताने त्याची खरेदी करतात. मात्र एकीकडे मोबाईलधारक ग्राहकांची संख्या आणि तुलनेने मोबाईल टॉवरची घटणारी संख्या अशा व्यस्त प्रमाणाच्या कात्रीत ग्राहक सापडलेला आहे. यामुळे त्याला कॉल ड्रॉप, रेंज इश्यूसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अवघ्या काही सेकंदाचा अवकाश की, कॉल कट होणे, तर नेमक्या महत्त्वाचे काही नेटवर सर्फिंग करताना रेंज कमी होणे यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत.

सध्या शहरातील मध्यवस्तीत मोठ्या संख्येने प्रमुख मोबाईल कंपन्यांचे टॉवर उभारण्यात आले आहेत. मात्र, ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता ते टॉवर पुरेसे नसल्याचे दिसून येत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी सातत्याने होणारे कॉल ड्रॉप आणि रेंज इश्यू यामुळे ग्राहक त्रस्त झाले होते. आतादेखील शहराच्या विविध भागांमध्ये रेंजचा प्रश्न अनुत्तरित आहे. शहरी भागात ही परिस्थिती असताना ग्रामीण व दुर्गम परिसरात तर ग्राहकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे नेट पॅक आणि व्हॉईस कॉलिंगकरिता आकर्षक सवलती जाहीर करुन ग्राहकांच्या गळी आपली सेवा उतरविताना मोबाईल कंपन्या ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे आपली तक्रार संबंधित कंपनीकडे नोंदवल्यानंतर त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादाने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. अनेकदा तक्रार केल्यानंतर देखील कुठलीच दखल न घेता बिनदिक्कतपणे तीच सेवा पुढे सुरु ठेवण्यापर्यंत त्यांची मजल जाते. यामुळे त्रस्त ग्राहकांकडून आम्ही नेमकी कुणाकडे दाद मागायची आणि आमच्या शंकाचे समाधान कुणाकडून होईल? असे प्रश्न त्यांच्याकडून विचारले जात आहेत.

विमाननगर परिसरात वायुदलाने सुरक्षेच्या कारणास्तव काही प्रमाणात मोबाईल रेंजची क्षमता सीमित केले असल्याचे सांगण्यात येते. तर कॅन्टोन्मेंट भागात कार्यरत असणाºया लष्करी खात्याकडून देखील फॉर ‘सिक्युरिटी पर्पझ’करिता रेंजच्या कमाल आणि किमान क्षमतेत फरक पडल्याचे पाहावयास मिळते.

नेटवर्क वाढविण्याकरिता त्याच्या विविध उपाययोजनांवर भर द्यावा लागेल. अशा वेळी व्यवस्थापनामध्ये जीआयएसचा त्या नेटवर्क प्लॅनिंगकरिता उपयोग करता येणे शक्य आहे. त्याचबरोबर मोबाईल कंपन्यांनी थ्रीडी मॅप डेटाचा उपयोग करुन मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करुन शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या नेटवर्क समस्यांची माहिती करून घेणे गरजेचे आहे.

सध्या शहरात वाय फाय सुविधा जागोजागी बसविली आहे. ते प्रमाण व्यापक पद्धतीने वाढल्यास ग्राहकाला त्याचा फायदा होईल. यामुळे काही अंशी का होईना नेटवर्कचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शहरातील या प्रमुख भागांत ‘रेंज’ इश्यू
येरवड्यातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड
शासकीय मध्यवर्ती इमारत
कॅन्टोन्मेंट
बोर्ड
विमाननगर
आंबेगाव, नºहे
वारजेतील काही भाग
कळस, धानोरी

कॉल ड्रॉप होण्याची कारणे...
टॉवरची मर्यादित संख्या
सदोष नेटवर्क यंत्रणा, सातत्याने नेटवर्कमध्ये तयार होणारे अडथळे
मर्यादित टॉवरवर ग्राहकांच्या वाढत्या संख्येचा येणारा ताण, दिवसेंदिवस वाढत जाणारे ग्राहक त्या तुलनेत टॉवरची संख्या कमी.
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना ’टॉवर शिफ्टिंग’मध्ये होणारा बदल यामुळे देखील अनेकदा कॉल ड्रॉप आणि रेंजच्या समस्येला सामोरे जावे लागते.
मागील दोन ते तीन वर्षांपासून टॉवर रेडिएशनचा मानवाच्या शरीराला धोका. यामुळे आता टॉवरकरिता इमारती उपलब्ध होत नसल्याने मोबाईल कंपन्याचीदेखील गैरसोय होत आहे.

मोबाईल टॉवरवरच्या रेडिएशनमुळे माणसांच्या व पक्ष्यांच्या जीवाला धोका असा चुकीचा समज लोकांमध्ये पसरविण्यात आल्याने मोठे नुकसान झाले. वास्तविक त्या रेडिएशनमुळे कॅन्सर होतो, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. कुठल्या शास्त्रज्ञानेदेखील ते सिद्ध करुन दाखविले नाही. मात्र, आपल्याकडे ज्या चुकीच्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार झाला, त्याचा फटका मोबाईल कंपन्यांना झाला. त्यांना पुरेशा प्रमाणात टॉवर उभारण्याची संधीच दिली जात नसल्याने ग्राहकांना रेंज आणि कॉल ड्रॉपच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
- डॉ. दीपक शिकारपूर (सायबरतज्ज्ञ)

Web Title: Leave the call drop text, get some of the range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.