आर सेव्हनअंतर्गत असलेल्या सदनिकांचा ताबा सोडा : अन्यथा साहित्य जप्त होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:11 AM2021-09-03T04:11:27+5:302021-09-03T04:11:27+5:30
पुणे : महापालिकेने आर ७ अंतर्गत ताब्यात घेतलेल्या हजारो सदनिकांमध्ये काही ठिकाणी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले ...
पुणे : महापालिकेने आर ७ अंतर्गत ताब्यात घेतलेल्या हजारो सदनिकांमध्ये काही ठिकाणी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित नागरिकांनी येत्या सात दिवसांत सदनिका रिकाम्या कराव्यात, अन्यथा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासोबतच त्या सर्व सामानासह ताब्यात घेण्यात येतील, अशी नोटीस आज महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी संबंधितांना बजावली आहे.
बांधकाम नियमावलीतील आर ७ अंतर्गत मिळणाऱ्या सदनिकांवर महापालिकेची मालकी आहे. या सदनिका प्रामुख्याने प्रकल्प विस्थापितांना भाडेतत्वावर देण्याचे प्रयोजन आहे. महापालिकेला आर ७ अंतर्गत मिळालेल्या सदनिकांमध्ये अनेक ठिकाणी प्रकल्प विस्थापित भाडेकरू म्हणून राहात आहेत. परंतु काही ठिकाणी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असल्याचे मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या पाहाणीत आढळून आले आहे. संबधित नागरिकांनी येत्या सात दिवसांत या सदनिका सुस्थितीत रिकाम्या कराव्यात. अन्यथा या सदनिकांमध्ये अनधिकृतरीत्या प्रवेश केल्याप्रकरणी ट्रेसपासचा गुन्हा दाखल करून, सर्व साहित्यासह सदनिका ताब्यात घेण्यात येतील, अशी नोटीस बजावण्यात आल्याचे राजेंद्र मुठे यांनी सांगितले.