पाडव्याच्या मुहूर्तावर म्हाडाची तब्बल २८९० घरांची सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:09 AM2021-04-12T04:09:45+5:302021-04-12T04:09:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापुर व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल २८९० घरांची सोडत म्हाडा काढत आहे. येत्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापुर व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल २८९० घरांची सोडत म्हाडा काढत आहे. येत्या मंगळवार (दि.१३) रोजी म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हाडाच्या वतीने ही सोडत जाहीर करणार आहे. कोरोना संकट असतानाही सहा महिन्यांत दोन वेळा आणि तेही तब्बल दोन हजारपेक्षा अधिक घरांची सोडत काढण्याचा नवा विक्रम पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे म्हाडाने केला आहे.
पुणे म्हाडाच्या योजनेतील २१५६ सदनिका व २०% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या ७३४ सरदनिका असे एकूण २८९० सदनिकांची गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ही सोडत काढणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री सतेज पाटील, प्रधान सचिव व्ही. आर. श्रीनिवास, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर अदीच्या उपस्थितीमध्ये (दि.१३) रोजी सकाळी ९ वाजता देवगिरी या शासकीय निवासस्थानी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन पद्धतीने ही सोडत काढणार आहे.
पुणे म्हाडाला मागील २ महिन्यांपूर्वी २२ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या लॉटरीमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. एकाच वेळी तब्बल ५ हजार ६४६ सदनिकांची सोडत काढली होती.
------
या घरांसाठी असेल सोडत
- प्रधानमंत्री आवास योजना - ६४१ दनिका
- म्हाडा गृहनिर्माण योजना - १८ सदनिका
- २०% सर्व समावेशक गृहनिर्माण योजना - ७३४
पुणे महानगरपालिका : ३००
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका : ४३४
- म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत (प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य) - १४९७
---
असा करता येणार अर्ज
म्हाडाच्या २ हजार ८९० घरांसाठी १३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता ते १३ मे सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येऊ शकेल. तरी इच्छुकांनी https://lottery.mhada.gov.in तसेच www.mhadamaharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या अर्जाची नोंदणी करावी
- नितीन माने पाटील, मुख्य अधिकारी, पुणे म्हाडा