ऑफलाइन सोडून विद्यार्थ्यांचा ऑनलाइन परीक्षेकडे ओढा, पर्याय निवडीचा रविवारी अंतिम दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 10:45 AM2020-09-27T10:45:40+5:302020-09-27T10:46:32+5:30
अंतिम वर्षाची परीक्षा : पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील संलग्न महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेतल्या जाणार आहेत.
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठतर्फे घेतल्या जाणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी पूर्वी ऑफलाइन परीक्षेचा पर्याय निवडणाऱ्या सुमारे बाराशे विद्यार्थ्यांनी आता ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला आहे.विद्यार्थ्यांना येत्या (दि.२७) रविवारपर्यंत परीक्षेचा पर्याय बदलता येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडावा ,असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यापरीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी केले आहे.
पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील संलग्न महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेतले जाणार आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षेचा पर्याय दिला. त्यात अधिकाधिक विद्यार्थी ऑनलाइन परीक्षेला पसंती देत आहेत. अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख २८ हजार ४९९ एवढी असून त्यातील १ लाख ८९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला आहे. तर ३९ हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेला पसंती दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून विद्यापीठाने विद्यार्थ्यांसमोर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्याचा पर्याय ठेवला. त्यास विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.ऑनलाइन परीक्षा पद्धतीतही सर्वाधिक विद्यार्थ्यांनी मोबाईलद्वारे परीक्षा देण्याचा पर्याय निवडला आहे.तर सुमारे 39 हजार विद्यार्थी ऑफलाइन पद्धतीने 'ओएमआर शीट' द्वारे परीक्षा देणार आहेत. त्यातही अद्याप ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्हीपैकी कोणताही परीक्षेचा पर्याय न निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १९ हजार आहे. या विद्यार्थ्यांनी पर्याय निवडल्यास त्यांना ऑफलाइन पद्धतीने परीक्षा द्यावी लागणार आहे. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देण्याचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परीक्षा केंद्रा पैकी एक परीक्षा केंद्र परीक्षा देण्यासाठी निवडावे, असेही आवाहन विद्यापीठ प्रशसनातर्फे करण्यात आले आहे.
विद्यापीठाने ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही परीक्षेचा पर्याय निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली असून बरेच विद्यार्थी पूर्वी निवडलेल्या ऑफलाइन परीक्षेचा पर्याय बदलून ऑनलाइनचा पर्याय स्वीकारत आहेत.गेल्या काही दिवसात सुमारे १ हजार २०० विद्यार्थ्यांनी ऑफलाइन सोडून ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला. तर केवळ ४ विद्यार्थी ऑनलाइन सोडून ऑफलाइनला गेले आहेत.- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा मूल्यमापन मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ