हडपसर सहायुक्तालयात डुकरे सोडून शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 08:50 PM2018-05-28T20:50:54+5:302018-05-28T20:50:54+5:30
पुणे मनपा आयुक्तालयात डुकरे सोडून पाणीप्रश्न, वाहतूक कोंडी, भुयारी मार्गाच्या कामासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले.
हडपसर : वारंवार आंदोलने करून निवेदने देऊनही डुकरे, पाणीपुरवठा, वाहतूक समस्या, अतिक्रमणे हे प्रश्न सुटत नसल्याने शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी हडपसर सहायुक्तालयात डुकरे सोडून उपोषण केले. प्रभाग क्रमांक २६ मधील सातवनगर, हांडेवाडी रोड या भागात मोकाट डुकरे आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. पथारी व्यावसायिक, अनधिकृत भाजी मंडई यामुळे रोज हांडेवाडी रोडवर वाहतूक कोंडी होते आहे. सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाचे काम मंजूर होऊनही अद्याप सुरू झालेले नाही. हे सर्व प्रश्न सुटण्याकरिता वारंवार पत्रव्यवहार, निवेदने देऊनही प्रशासन काही हालचाल करत नसल्याने आज सहायुक्तलयात डुकरे सोडून उपोषण करण्याची वेळ आल्याचे नान भानगिरे यांनी सांगितले.
यावेळी सहाययक आयुक्त उपस्थित नसल्याने इतर शिवसैनिकानी आंदोलन व उपोषण मागे घेण्यास नकार दिला.त्यामुळे पुणे महापालिकेचे अतिक्रम अधिकारी माधव जगताप, आरोग्य अधिकारी हेमंत देवधर, विजय पवार, सुभाष पवार आदींनी आंदोलन स्थळी भेट देऊन सर्व प्रश्न सोडवण्याची लेखी ग्वाही देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.याप्रसंगी आशिष आल्हाट, विकास भुजबळ, सचिन तरवडे, वीरभद्र गाभने, शिवा शेवाळे, म्हेत्रे काका, विनायक पाटील, अभिजित बाबर, संतोष जाधव आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भानगिरे म्हणाले, दिवसाआड अपुऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिकांचे हाल होत आहेत. डुकरामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले. पण पालिका प्रशासन काहीच करायला तयार नाही. केवळ आश्वासने देण्याचे काम अधिकारी वर्ग करत आहेत. इतर प्रभागानमध्ये नियमित रोज पाणी येते, पण प्रभाग क्र.२६ मध्ये मात्र दिवसाआड पाणी येत आहे. सर्वात जास्त कर या प्राभागातून पालिका मिळवतो. पण सुविधा मात्र देत नाही, असा आरोप त्यांनी करतानाच आता पुणे मनपा आयुक्तालयात डुकरे सोडून पाणीप्रश्न, वाहतूक कोंडी, भुयारी मार्गाच्या कामासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले.
तसेच हंडेवाडी रोड चे अतिक्रमण तसेच भाजी मंडईचे स्थलांतर ६ जून पर्यंत करून देणार आहे. तसेच हंडेवाडी रोड ‘नो हॉकर्स झोन’ करून देणार अशी ग्वाही अतिक्रमण विभाग माधव जगताप (उपयुक्त अतिक्रमण), दिलीप पोवरा (क्षेत्रिय अधिकारी) डी. एस. ढोकले (अतिक्रमण झोन आॅफिसर) यांनी दिली.डुक्कर मुक्त प्रभाग १ ते २ महिन्यांत पर्याय जागेमध्ये स्थलांतर करणार अशी ग्वाही आरोग्य विभाग वैशाली साबने, डॉ. मोरे, डॉ. वाघ, डॉ. माने यांनी सांगितले.