सरपंच पदाची आरक्षण सोडत ८ डिसेंबरला जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:27 AM2020-11-26T04:27:07+5:302020-11-26T04:27:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे तब्बल दहा महिने लांबणीवर पडलेल्या चौदाशे ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची पाच वर्षांसाठीची आरक्षण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे तब्बल दहा महिने लांबणीवर पडलेल्या चौदाशे ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची पाच वर्षांसाठीची आरक्षण सोडत येत्या ८ डिसेंबरला काढली जाणार आहे. तालुकास्तरावर तहसील कार्यालयामार्फत या आरक्षण सोडतीचे नियोजन केले जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवार (दि. २४) आरक्षण सोडतीची घोषणा केली.
पुणे जिल्ह्यातील तब्बल ७४९ ग्रामपंचायतीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, जानेवारी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. त्यापूर्वी दर पाच वर्षांत एकदा सर्व ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर केली जाते. यंदा मार्च-एप्रिल महिन्यातच ही सोडत जाहीर होणार होती. परंतू कोरोनाच्या संकटामुळे ही सोडत लांबणीवर पडली होती.
जिल्ह्यात १४०८ ग्रामपंचायती असून त्यातील चौदाशे ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काढली जाईल. आठ ग्रामपंचायती नव्याने स्थापन झालेल्या आहेत. नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायती संदर्भात शासनाकडून अद्याप आरक्षणाबद्दल चे कोणतेही आदेश नसल्याने या आठ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत काढली जाणार नाही.
चौकट
सरपंचपदाचे आरक्षण
सर्वसाधारण गट - ३७३
सर्वसाधारण महिला - ३८३
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) - १७७
नागरिकांचा मागास प्रवर्ग - १७०
अनुसूचित जमाती महिला - ३०
अनुसूचित जमाती - २८
अनुसूचित जाती महिला - ६६
अनुसूचित जाती - ५९
अनुसूचित क्षेत्र महिला - ५८
अनुसुचित क्षेत्र - ५६