तुकाराम मुंढे सभागृह सोडून गेल्याने पुणे महापालिका सभागृहात गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:55 PM2017-11-22T13:55:50+5:302017-11-23T00:44:40+5:30
सभागृहात सदस्यांची भाषणे सुरू असतानाच मुंडे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना विचारून सभागृहच सोडले. त्यामुळे पुणे महापालिकेच्या सभागृहात गोंधळ झाला.
पुणे : महापालिकेच्या बुधवारी झालेल्या खास सभेत पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी गेल्या वर्षभरात पीएमपीमध्ये केलेल्या सुधारणांची माहिती देऊन पीएमपीचे प्रगतिपुस्तक सादर केले. मात्र, जनहिताच्या योजना बंद केल्याचा आरोप करू ते अमान्य केले गेले. त्यातच मुंढे सभागृहातून अचानक निघून गेल्याने विरोधकांनी कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, भारतीय जनता पक्षाने केवळ निषेधाचा ठराव मंजूर केला.
महापालिकेच्या विशेष सभेपुढे मुंढे येणार नव्हते; मात्र आयुक्त कुणाल कुमार, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, पीएमपीचे संचालक नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांच्या आग्रहामुळे ते बरोबर ११ वाजता सभेत उपस्थित झाले. महापौर मुक्ता टिळक नसल्याने उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या उपस्थितीत सभेचे कामकाज सुरू झाले. पीएमपीच्या कारभारात केलेल्या सुधारणांची माहिती दिल्यावर मुंढे सर्वसाधारण सभेतून अचानक निघून गेले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस, मनसे यांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर राजकीय निशाणा साधून टीका केली. भाजपा पदाधिकाºयांनाही अखेर मुंढे यांचा निषेध करावा लागला. मात्र, त्यात त्यांनी त्यांच्यावरील कारवाईचा विरोधकांचा प्रस्ताव नामंजूर केला.
मुंढे निघून गेले त्याच वेळी काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी ते कोणाला विचारून गेले, असा सवाल केला. पीठासन अधिकारी असलेले उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी ‘मला विचारलेले नाही,’ असे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांचे सदस्य आक्रमक झाले. महापौरांसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. मुंढे यांनी सभागृहाचा, समस्त पुणेकरांचा अवमान केला आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली.
>आकडेवारीसह तोटा कमी
केल्याचे सिद्ध
तुकाराम मुंढे यांनी सलग ४० मिनिटे केलेल्या भाषणात त्यांनी पीएमपीमध्ये केलेल्या बदलांची माहिती दिली. सेवा प्रवासीकेंद्रित करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.
एका बसमागे ५ कर्मचारी, असे प्रमाण आवश्यक असताना ते एका बसमागे ९ पेक्षा जास्त कर्मचारी होते.
पदोन्नतीमध्ये शिस्त नव्हती. रात्रपाळी बंद केली होती. खासगी कंपन्यांच्या गाड्या भरमसाट भाडेतत्त्वावर घेऊन त्या वापरायच्या
व कंपनीच्या गाड्यांना मात्र कमी फेºया
द्यायच्या यामुळे तोटा
वाढत चालला होता. आता तो कमी झाला आहे, हे त्यांनी आकडेवारीने स्पष्ट केले.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांची बस बंद केल्याने आंदोलन
मागासवर्गीय विद्यार्थ्यांची बस बंद केली म्हणून राष्ट्रवादीचे भैयासाहेब जाधव यांनी महापौरांसमोरच्या मोकळ्या जागेत बसून आंदोलन सुरू केले.
नंतर याच कारणासाठी राष्ट्रवादीचेच महेंद्र पठारे, संजिला पठारे, सुमन पठारे यांनीही महापौरांसमोरच्या मोकळ्या जागेत बसून आंदोलन सुरू केले. एकाच वेळी चार नगरसेवक असे खाली बसल्यामुळे सभागृहात आणखी गोंधळ झाला.
दरमहा १२ कोटी रुपये पीएमपीला संचालन तूट
पीएमपीला संचालन तूट म्हणून फेब्रुवारी २०१८पर्यंत दरमहा १२ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव सभेत मंजूर झाला. मात्र, सभेतून अचानक निघून गेल्याने त्यांच्यावर कंपनी कायद्यानुसार कारवाई करावी, हा विरोधकांचा प्रस्ताव नामंजूर झाला. संख्याबळाच्या जोरावर भाजपाने विरोधकांचा प्रस्ताव बारगळवला.
>केवळ रंगरंगोटी असल्याची टीका
प्रशांत जगताप यांनीही मुंढे केवळ रंगरंगोटी करून सांगत आहेत, अशी टीका केली. एसटी महामंडळ तोट्यात आहे म्हणून आपण टीका करतो व पीएमपीने त्यांचे निवृत्त कर्मचारी मोठ्या वेतनावर, त्यांना गाडी वगैरे देऊन घेतले आहे. यासाठी संचालक मंडळाची मान्यता घेतली नाही. एका खासगी कंपनीकडून ११२ कर्मचारी घेतले. त्यासाठी कंपनीला त्यांचे आगाऊ वेतन १ कोटी ९६ लाख रुपये दिले. त्यालाही संचालक मंडळाची मान्यता घेतली नाही, अशी मनमानी योग्य नाही, असे जगताप म्हणाले.