संतसाहित्याने एकात्मदृष्टीचा विकास : डॉ. अशोक कामत; पुण्यात संतसाहित्यावर व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:00 PM2018-02-12T13:00:48+5:302018-02-12T13:01:39+5:30
संतांनी जोपासलेली एकात्मतेची दृष्टी विकसित होण्यासाठी संत साहित्याचा अभ्यास आवश्यक आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले.
पुणे : अलीकडे आपले जातीय, प्रांतिक, भाषिक सांप्रदायिक अभिनिवेश वाढलेले आहेत. भाषावार प्रांतरचनेमुळे आपण अधिक संकुचित झालो आहोत. अशा वेळी संतांनी जोपासलेली एकात्मतेची दृष्टी विकसित होण्यासाठी संत साहित्याचा अभ्यास आवश्यक आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या वतीने आयोजित कै. श्रीकृष्ण ठकार स्मृती व्याख्यानमालेत ‘संत नामदेव आणि संत तुकाराम यांचे ऐतिहासिक कार्य’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी संस्थेचे वा. ल. मंजूळ, पंडित वसंतराव गाडगीळ, गणितज्ञ डॉ. रवींद्र जोशी, डॉ. श्रीनंद बापट, डॉ. अमृता नातू, आर्थिक सल्लागार गिरीश ठकार उपस्थित होते.
कामत म्हणाले, आपला इतिहास विश्वकल्याणकारी आणि सांस्कृतिक आहे. तो राजकीय लढायांचा नाही. संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम या चारही संतांच्या समन्वयशील वृत्तीमुळे वारकरी परंपरा टिकली. नामदेव आणि तुकाराम यांच्याबाबत विचार करताना असं लक्षात येते की दोघांच्याही समोर काळाचे विशिष्ट आव्हान होते. हे दोन्ही संत एकमेकांना पूरक होते. ‘नामाचा तुका’ म्हणून वारकरी पंथमान्यता लाभलेले तुकाराम महाराज यांच्या काव्यकार्याशीही नामदेवरायांचा उत्कट अनुबंध आढळतो. तो अभ्यासला तर संत तुकारामांची ऐतिहासिक कामगिरी स्पष्ट होते. तसेच स्फुट रचना हीच दोहोंची मूळ प्रवृत्ती. ती रचना कीर्तनोपयोगी असणे हे ब्रीद. नामदेवांचे अनेक अभंग परिष्कृत रूपात तुकोबांनी पुन्हा सादर केले, असे दाखविता येते.