साहित्यिकांनी क्रांतिकारक व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:34 AM2019-02-25T00:34:46+5:302019-02-25T00:34:54+5:30
निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे मत : सातव्या सम्यक साहित्य संमेलनाचा समारोप
पुणे : सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी समाजप्रबोधन होणे गरजेचे असून, ते प्रबोधन करण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे. ही जबाबदारी पार पाडताना साहित्यिकांनी क्रांतिकारक व्हायला हवे. समाजात बदल घडवायला हवेत. शब्द, शास्त्र वापरून समतेवर, बंधुत्वावर आधारलेला संविधानिक समाज निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. केवळ माणुसकीच्या निकषावर तपासून जगणार धर्म आणायचा आहे. तरच आपण आणि जगही वाचेल, असे मत माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डिपार्टमेंट आॅफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज आणि बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी सावंत बोलत होते. संविधाननगरी, बालगंधर्व रंगमंदिरात गंगाधर पानतावणे विचारमंचावर झालेल्या या कार्यक्रमावेळी संमेलनाध्यक्ष जी. के. ऐनापुरे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, प्रकाशक प्रा. विलास वाघ, डॉ. अनिल सपकाळ, प्रमुख संयोजक परशुराम वाडेकर, डॉ. विजय खरे, प्रा. किरण सुरवसे, दीपक म्हस्के, अमरनाथ सिंग, धर्मराज निमसरकर, संजय सोनावणे आदी उपस्थित होते.
प्रा. विलास वाघ, डॉ. अनिल सपकाळ यांनीही आपले विचार मांडले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. परशुराम वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विजय खरे यांनी आभार मानले.
स्पष्टपणे बोलण्याची आवश्यकता...
१ ऐनापुरे म्हणाले, स्पष्टपणे बोलण्याची आवश्यकता आहे. देशाच्या सध्या परिस्थितीने काहूर माजले आहे. कधी नव्हती तेवढी अशांतता आहे. आता संविधानाची जास्त गरज आहे. भारतीय तत्त्वज्ञानात विषमतेचे समर्थन आहे. हेच वैशिष्ट्य आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी शेवट केला.
२ आता त्याला शह देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. हीच चिंतेची बाब आहे. आपल्याला आता नव्याने हा लढा उभा करण्याची वेळ आली असून, धोकादायक परिस्थिती कशी दूर करायची हा प्रश्न आहे. ईश्वर, पाप, पुण्य, आत्मा अशा अनेक काल्पनिक गोष्टी उभ्या करून सर्वसामान्य माणसाला गुंतवून ठेवले आहे. अशा परिस्थितीत संमेलनाची आवश्यकता आहे.
समाजाची मानसिकता शेकडो वर्षे निरनिराळ्या विषाने भरली आहे. जातीअंधता, धर्मांधता, गुलामगिरी या सर्वांच्या मुळाशी स्वार्थ, असहिष्णूता, द्वेष अशा विषाणूंची गर्दी आहे. साहित्यिक या विषाणूंचा नायनाट करू शकतील. पूर्वजांच्या चुकांची ओझी पुढे नेण्याची जबाबदारी नसली, तरी ते दुरुस्त करणे हे कर्तव्य आहे. त्यासाठी बंडखोर व्हावे लागेल, रोष स्वीकारावे लागेल. पण जे हे व्रत पाळतील तेच हे कार्य करू शकतील.
- पी. बी. सावंत
आजची मतदान व्यवस्था केवळ सरकार बदलू शकते. पण मूलभूत परिस्थिती कोणीही बदलवू शकत नाही. व्यवस्था परिवर्तनाचा विचार असायला हवा. साहित्याची ठोस चर्चा करण्यासाठी त्याला समाजव्यवस्थेचा आधार हवा. समाजप्रमाणे विचार निर्माण होतात, विचाराप्रमाणे समाज नाही. पण यासाठी रक्तरंजित क्रांतीची गरज नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने दिलेल्या संदेशाची अंमलबजावणी केली तरी क्रांती घडेल.
- डॉ. रावसाहेब कसबे