आंदोलनामुळे लक्ष्मी रस्त्याची डावी अन् उजवी बाजू मोकळी; भक्तांसाठी खुला पूर्व भागातील गणेशोत्सव मंडळांचा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 05:05 PM2024-09-13T17:05:18+5:302024-09-13T17:05:39+5:30
भक्तांना पूर्व भागात येऊ दिले जात नाही, पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाच्या या भूमिकेमुळे पूर्व भागातील गणेशोत्सव बंद पडत चालला आहे
पुणेः गणेशोत्सव काळातील गर्दी आणि वाहतुकी संदर्भात पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाचा पूर्वग्रह आणि चुकीच्या नियोजनामुळे पुण्याच्या पूर्व भागातील गणेशोत्सव मंडळे गणेश भक्तांअभावी ओस पडत होती. गुरुवारी ( दि. 12) पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे अध्यक्ष रविंद्र माळवदकर यांच्या नेतृत्वाखाली बेलबाग चौक येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. मात्र, पोलिसांनी सहकार्याची भूमिका घेत बेलबाग चौकातूनलक्ष्मी रोडची डावी आणि उजवी बाजू गणेशभक्तांकरिता तात्काळ मोकळी करून दिली.
परिमंडळ १ चे प्रमख प्रवीण पाटील यांनी चर्चा करून यावर् मार्ग काढला. यावेळी पूर्व भागातील अनेक गणेश मंडळे सहभागी झाले होती. साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे अध्यक्ष रविंद्र माळवदकर म्हणाले की, पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाच्या या भूमिकेमुळे पूर्व भागातील गणेशोत्सव बंद पडत चालला आहे. भक्तांना पूर्व भागात येऊ दिले जात नाही. नागरिकांना शिवाजी रोडलाच वळवले जाते. शिवाजी रोडचा पूर्व भाग आणि पश्चिम भागाच्या दृष्टीने हे अतिशय धोकादायक आहे. ही बाब अत्यंत चुकीची असून यापूर्वी देखील आम्ही पोलीस व म.न.पा-च्या मिटींग मध्ये वेळोवेळी हे मुद्दे मांडून सुद्धा आमच्या पदरी निराशाच पडली आहे. या आधी देखील आम्ही आंदोलने केली आहेत.
या आंदोलनात रविंद्र माळवदकर, भाऊसाहेब करपे, भाई कात्रे, शैलेश बढाई, अजय भोसले, मनीष साळुंखे, दत्ता सागरे, रविंद्र शिंदे, उदय महाले, नितीन गोंधले, संतोष भुतकर, रवी किरपे, संतोष कोणकर, अमोल सारंगकर, शाम मेमाणे, बबलू मायनर, उमेश सपकाळ, वैभव काणेकर, संजय मोरे सहभागी झाले होते.