पुणे : मांजरेवाडी येथे चासकमानचा डावा कालवा फुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 11:11 AM2022-07-16T11:11:38+5:302022-07-16T11:20:13+5:30

पाणी शेतात आल्याने शेतीचे प्रचंड नुकसान...

Left canal of Chasakaman burst at Manjrewadi rain update in pune district | पुणे : मांजरेवाडी येथे चासकमानचा डावा कालवा फुटला

पुणे : मांजरेवाडी येथे चासकमानचा डावा कालवा फुटला

Next

शेलपिंपळगाव (पुणे)  मांजरेवाडी (ता. शिरूर) येथे चासकमान धरणाचा डाव्या कालव्याला शुक्रवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास भगदाड पडून कालव्यालगत असणाऱ्या शेतांमध्ये लाखो लिटर पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतांचे नुकसान झाले आहे. दरम्यान चासकमान धरणातुन कालव्याला सोडलेले पाण्याचे आर्वतन बंद केले असून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.

चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी खेड व शिरूर तालुक्याला वरदान ठरत आहे. डावा कालवा चास धरण ते शिरूर असा १४४ किलोमीटर अंतराचा असून येथील शेतकरी याच पाण्याच्या आर्वतनावर रब्बी व उन्हाळ्यातील पिके घेत असतात. कालव्याच्या कामाला २५ वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. कालवा मुरुम व मातीचा भराव दोन्ही बाजुने टाकून बनविण्यात आला आहे. कालव्यालगत मोठमोठी झाडे झुडपे उगवली आहेत. या झाडांच्या मुळ्या जमिनित गेल्याने कालव्याची माती ठिसूळ झाली आहे.

दरम्यान सततच्या पावसाने चासकमान धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे आजअखेर ९० टक्के धरण भरले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून डाव्या कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. मात्र मांजरेवाडी हद्दीत कालव्याची माती ढिसुळ झाल्याने अचानक मोठे भगदाड पडले आहे. या भगदाडातून मोठ्या प्रमाणात पाणी लगतच्या शेतांमध्ये वाहिले जात आहे. स्थानिकांनी पाटबंधारे विभागाला कालवा फुटल्याची माहिती दूरध्वनीद्वारे दिली. शनिवारी (दि.१६) सकाळी पाटबंधारे विभागाने कालवा बुजविण्याच्या कामाला सुरुवात केल्याची माहिती पोलीस पाटील सोनाली वाजे यांनी दिली.

डाव्या कालव्याचे काही ठिकाणी अस्तरीकरण करण्यात आले आहे. पाणी जाण्यासाठी सिमेटंचे बांधकाम, भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. अद्यापही कालव्याचे अस्तरीकरणाचे काम झालेले नाही. त्यामुळे अनेक भागात कालव्यातील पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या गळतीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक बनल्या आहेत. याकडे पाटबंधारे विभागाचे पुर्णपणे दुर्लक्ष होत आहे. 

Read in English

Web Title: Left canal of Chasakaman burst at Manjrewadi rain update in pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.