PM मोदींच्या दौऱ्यावेळी आंदोलने केल्यास कायदेशीर कारवाई; महाविकास आघाडीच्या नेत्यांना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 09:33 PM2023-07-31T21:33:48+5:302023-07-31T21:34:40+5:30
पुणे दौऱ्यात मोदींना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात येणार असल्याचे ‘इंडिया फ्रंट’ या विरोधी पक्षाने जाहीर केले आहे
पुणे : जळते मणिपूर वाऱ्यावर सोडून देश-परदेशात दौरे करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिथे जाण्यासाठी वेळ नाही. त्यासंबंधी त्यांनी साधे निवेदनही प्रसिद्ध केलेले नाही. या निषेधार्थ पुणे दौऱ्यात मोदींना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात येणार असल्याचे ‘इंडिया फ्रंट’ या विरोधी पक्षाच्या राजकीय आघाडीच्या पुणे शाखेच्या वतीने जाहीर केले होते. तसेच महात्मा फुले मंडई येथील टिळक पुतळ्यासमोर सकाळी निषेध आंदोलन करण्यात येणार होते. त्याअगोदरच पुणे पोलिसांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गटाच्या नेत्यांना नोटीसा बजावल्या आहेत. कुठल्याही प्रकारे आंदोलन केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 149 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
कॉग्रेस, राष्ट्रवादी, उध्दव ठाकरे शिवसेना व इतर सामाजिक संस्थांच्या वतीने हे आंदोलन होत आहे. मणिपूरच्या घटनेविषयी तुम्ही अस्वस्थ आहात का? आपल्या देशातल्या एका भागामध्ये सुरू असलेल्या या वंशसंहाराच्या घटनांबद्दल तुम्हाला चिंता वाटते का? एकूणच देशातील केंद्र सरकारच्या कारभारामुळे सामान्य माणसाचे जीवन यातनामय झाले आहे. याविषयी आपली तगमग होत आहे का? जर तुम्हाला तसे वाटत असेल तर आता शांत बसून चालणार नाही. लोकशाहीमध्ये सनदशीर शांततेच्या मार्गाने उद्या निषेध व्यक्त होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सह अनेक पक्ष उद्या पुणे शहरात करणार आंदोलन करणार आहेत. त्याच अनुषंगाने आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे.
पवार स्टेजवर, आम्ही आंदोलनात यात गैर काय!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र मोदींविरोधी आंदोलनात सहभागी हाेणार असल्याने नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. सगळीकडे याचीच चर्चा असताना पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ‘यात काही गैर नाही’ असे ते सांगत आहेत. शरद पवार देशातील सर्वमान्य नेते आहेत आणि ते राजकारण, समाजकारण यात कधीही गल्लत करत नाहीत, असेही त्यांचे म्हणणे आहे. पक्षाचे पदाधिकारी म्हणून आम्हाला यात काही गैर वाटत नाही, असे राज्य प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले.