तणावग्रस्त नागरिकांना कायदेशीर आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:09 AM2021-05-23T04:09:43+5:302021-05-23T04:09:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात ताण-तणावाचा सामना करणाऱ्या नागरिकांना मानसिक व कायदेशीर आधार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात ताण-तणावाचा सामना करणाऱ्या नागरिकांना मानसिक व कायदेशीर आधार देण्यासाठी ‘हेल्प ऑन फोन’ अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत संस्थेचे वकील प्रतिनिधी सकाळी ११ ते ६ या वेळेत तणावग्रस्त महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे समुपदेशन करणार आहेत. मोफत कायदेशीर सल्लाही देणार आहेत.
वकिलांना कायदेशीर सेवा देणाऱ्या ‘जन अदालत’ संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे. कोरोना साथरोगाचा समाजाच्या सर्व स्तरावर विपरीत परिणाम झाला आहे. महिलांना कौटुंबिक वादाचा सामना करावा लागत आहे, बाहेर खेळता येत नसल्याने लहान मुले संगणक आणि मोबाईलमध्ये प्रमाणापेक्षा जास्त गुंतले आहेत, ज्येष्ठ नागरिकांना एकाकी वाटत आहे, या सर्वांना व्यक्त होण्यासाठी ‘हेल्प ऑन फोन’ ही मदतवाहिनी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्याद्वारे पुणे शहरातील आठ विभागांमध्ये संस्थेचे २१ वकील प्रतिनिधी आणि पिंपरी-चिंचवड विभागात ९ वकील प्रतिनिधी समुपदेशन करणार असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ॲड. सागर नेवसे, ॲड. नरहर कुलकर्णी, ॲड. राणी सोनवणे, ॲड. पल्लवी विघ्ने, ॲड. सारिका परदेशी यांनी केले आहे. ॲड. स्वाती चौधरी प्रतिनिधींशी समन्वय साधत आहेत.